पुढारी ऑनलाईन : राजस्थानमधील कोटा (Kota) येथे सोमवारी पुन्हा कोचिंग क्लासेसमध्ये शिकणार्या एका विद्यार्थ्याने जीवन संपवले. फौरीद हुसेन (वय २०) असे त्याचे नाव असून तो नीट (NEET) ची तयारी करत होता. तो मूळचा पश्चिम बंगालचा आहे. या वर्षात कोटामध्ये अशा प्रकारे जीवन संपवलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा २८ वर गेला आहे.
संबंधित बातम्या
NEET ची तयार करणाऱ्या हुसैनचा मृतदेह कोटामधील वक्फ नगर भागात भाड्याच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला होता. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार, हा विद्यार्थी भाड्याच्या घरात राहत होता, तेथे इतर काही विद्यार्थीही राहत होते. इतर विद्यार्थ्यांनी सांगितले की, त्यांनी हुसेनला शेवटचे ४ वाजता पाहिले होते. त्यानंतर त्याच्या खोलीचा दरवाजा सुमारे ७ वाजल्यापासून आतून बंद होता. हुसेन फोन उचलत नसल्याने त्याच्या मित्रांनी घरमालकाला याची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या खोलीत आढळून आला.
या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, त्याने नेमके कोणत्या कारणामुळे जीवन संपवले याचा तपास केला जात आहे. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आले आहे. शवचिकित्सा होताच विद्यार्थ्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
कोटामध्ये गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या जीवन संपवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
स्थानिक प्रशासनाने आता सर्व कोचिंग सेंटर्समधील पंख्यांमध्ये अँटी हँगिंग उपकरणे बसवणे बंधनकारक केले आहे. तसेच संस्थांनी दोन महिन्यांच्या कालावधीत कोणत्याही परीक्षा घेणे टाळाव्यात, असे निर्देश जारी केले आहेत.
घरमालकाने दिलेल्या माहितीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले. खोलीचा दरवाजा मोडून पोलीस आत गेले असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याने जीवन का संपवले? याचे कारण समोर आलेले नाही.
अभ्यासक्रम खूप अधिक आणि अवघड
कोटामध्ये विद्यार्थी जीवन संपवत असल्याच्या वाढत्या घटनांमुळे राजस्थानातील अशोक गेहलोत सरकारने एक समिती स्थापन केली होती. नुकतेच या समितीने दिलेल्या अहवालातून याची कारणे स्पष्ट केली आहेत. कोटा शहर विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. येथे मुख्यतः जेईई आणि नीट परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थी येतात. या दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम खूप अधिक आणि अवघड असतो.
जागा कमी आणि जीवघेणी स्पर्धा
येथे विविध परीक्षांची तयारी करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असून त्या तुलनेत जागा कमी असतात. सलग अनेक वर्षे अभ्यास करुनही निवड होत नसल्याने विद्यार्थ्यांत नैराश्य येते.
अभ्यासाचे ओझे आणि पालकांकडून मोठ्या अपेक्षा
त्यात आई- वडिलांच्या मुलाकडून मोठ्या अपेक्षा असल्याने त्याच्यावर मानसिक दबाव येतो. परीक्षेत यश मिळाले नाही की ती टोकाचे पाऊल उचलतात.
गुणांनुसार विद्यार्थ्यांची वर्गवारी
समितीने अहवालात म्हटले आहे की, कोचिंगमध्ये होणारी चाचणी आणि त्यातील गुणांनुसार विद्यार्थ्यांना वेगळे केले जाते. यामुळे मुलांवर मानसिक दबाव येतो आणि यातून विद्यार्थी जीवन संपवत आहेत.
अतिव्यस्त शैक्षणिक कार्यक्रम
कोचिंग संस्थांच्या अतिव्यस्त शैक्षणिक कार्यक्रम आणि त्यांचा मोठा अभ्यासक्रम मुलांचे जीवन संपवण्याचे कारण बनत आहे.
मुलांना सुट्टी नाही
कोचिंग दरम्यान मुलांना सुट्टी दिली जात नाही. ती अनेक दिवस कुटुंबापासून दूर राहतात. सुट्टी नसणे आणि इतर उपक्रम कमी असल्याने अनेकवेळा मुले मानसिक तणावाखाली राहतात.