Uttarakashi Tunnel Rescue : कामगारांपासून अवघ्या ३ मीटर अंतरावर बचाव पथक | पुढारी

Uttarakashi Tunnel Rescue : कामगारांपासून अवघ्या ३ मीटर अंतरावर बचाव पथक

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळीच्या दिवसापासून उत्तरकाशीतील निर्माणाधीन बोगद्यात अडकलेले ४१ कामगार लवकरच बाहेर येण्याची आशा आहे. बोगद्यात ५४ मीटर पाईप टाकण्यात आले आहेत. आता बचाव पथक कामगारांपासून केवळ ३ मीटर अंतरावर आहे. एकुण ५७ मीटरवर एस्केप पॅसेज पार करावा लागणार आहे. त्यामुळे कामगारांची कधीही सुटका होऊ शकते, असे मानले जात आहे.

बचावकार्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आज (दि.२८) पुन्हा दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, बचावकार्य वेगाने सुरू आहे. बोगद्यात सर्व काही ठीक आहे. कामगारांना लवकरच बाहेर काढले जाईल. मोठे अडथळे दूर झाले आहेत. बोगद्याच्या आत मॅन्युअल ड्रिलिंग सुरू आहे. ५७ मीटरपर्यंत ड्रिलिंग करावयाचे आहे. ५४ मीटरपर्यंत एस्केप पॅसेज तयार करण्यात आल्याने लवकरच कामगारांना बाहेर काढण्याची आशा आहे.

मुख्यमंत्री धामी यांनी सिल्क्यरा बोगद्यातील मजूरांच्या बचाव कार्याचा आढावा घेण्याआधी बोगद्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या बाबा बोखनागच्या मंदिराजवळ जावून सर्व कामगारांच्या सुरक्षित बाहेर येण्यासाठी प्रार्थना केली. दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री, निवृत्त जनरल व्ही.के.सिंह हेही सिल्क्यरा येथे पोहोचले आहेत. त्यांनीही मॅन्युअल ड्रिलिंगचा आढावा घेतला.

मजूरांच्या कुटुंबीयांकडून तयारी

बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांच्या कुटुंबीयांना तयार राहण्यास आणि मजुरांचे कपडे आणि पिशव्या तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. कामगारांना बाहेर काढल्यानंतर त्यांना उपचारासाठी चिन्यालिसौर रुग्णालयात नेण्यात येणार आहे.

हेही वाचा:

Back to top button