Maharashtra Winter session : हिवाळी अधिवेशन; उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी सज्ज होतोय ‘विजयगड’ | पुढारी

Maharashtra Winter session : हिवाळी अधिवेशन; उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी सज्ज होतोय 'विजयगड'

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील वर्तमान सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असल्याने अजित पवार यांना नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान कोणता बंगला मिळणाार, याची त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सूकता होती. मात्र, आता ती दूर झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच शेजारी असलेल्या परिसरात त्यांचे निवासस्थान असणार आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील आता बंगला बदलून घेतला आहे. ते 11 नंबरला वास्तव्यास असतील. अजित पवार यांना सिव्हील लाईन्स परिसरातील ‘विजयगड’ हा बंगला मिळाला आहे तर देवेंद्र फडणवीस हे ‘देवगिरी’वर मुक्कामाला असतील. (Maharashtra Winter session)
दरवर्षी हिवाळी अधिवेशनाच्या  कालावधीत तसेच नागपुरातील दौऱ्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर कॅबिनेट मंत्र्यांसाठी बंगले सज्ज असतात. नागपूर उपराजधानी असल्याने मुख्यमंत्र्यांसाठी ‘रामगिरी’ तर उपमुख्यमंत्र्यांसाठी ‘देवगिरी’ हे बंगले आहेत. मात्र, सध्याच्या महायुती सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी कुठलाही बंगला उपलब्ध नव्हता. सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस विभागासोबत मिळून अनेक बंगल्यांची पाहणी केली. मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या दर्जाला साजेसा आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून योग्य असा बंगला मिळत नव्हता. (Maharashtra Winter session)
अखेर उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी सिव्हिल लाईन्स परिसरात ‘विजयगड’ बंगला निश्चित करण्यात आला आहे. सध्या विजयगड बंगल्यात दुरुस्ती तसेच रंगरंगोटी आणि नवे बांधकामही सुरु आहे. या बंगल्याच्या रचनेत उपमुख्यमंत्र्यांच्या दर्जाला साजेसे बदल केले जात आहेत. मुंबईत मात्र मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यानंतर ‘देवगिरी’ बंगला हा भव्य मानला जातो. फडणवीसांनी हा बंगला अजित पवार यांच्याकडे कायम ठेवला आहे. मुंबईत फडणवीस हे सागर बंगल्यावरूनच काम पाहतात हे विशेष. (Maharashtra Winter session)

हेही वाचा:

Back to top button