Sanjay Raut | संजय राऊतांच्या ‘हिटलर’ पोस्टवर मोठा वाद, इस्रायली दूतावासाची MEA कडे तक्रार | पुढारी

Sanjay Raut | संजय राऊतांच्या 'हिटलर' पोस्टवर मोठा वाद, इस्रायली दूतावासाची MEA कडे तक्रार

पुढारी ऑनलाईन : इस्रायली दुतावासाने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पोस्टवर तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘हिटलर ज्यू समुदायाचा इतका द्वेष का करत होता? हे आता समजत आहे,’ अशी पोस्ट संजय राऊत यांनी त्यांच्या X अकाऊंटवर केली होती. मात्र, या पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर राऊत यांनी त्यांचे हे ट्विट डिलीट केले होते. पण या त्यांच्या पोस्टवर इस्रायली दूतावासाने नाराजी व्यक्त करत भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय (MEA) आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे.

संबंधित बातम्या 

१४ नोव्हेंबर रोजी संजय राऊत यांनी गाझाच्या अल-शिफा हॉस्पिटलमधील आव्हानात्मक परिस्थितीबद्दलचा एक रिपोर्ट पुन्हा शेअर केला होता आणि त्यावर स्वतःची हिंदीमधील कमेंट पोस्ट केली होती. ‘हिटलर ज्यू समुदायाचा इतका द्वेष का करत होता? हे आता समजत आहे,’ अशी पोस्ट केल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शेअर केलेल्या रिपोर्टमध्ये इस्रायलच्या हल्ल्यानंतर अल-शिफा हॉस्पिटलमध्ये वेळेपूर्वी जन्मलेले बाळ रडताना दाखवले होते. या रिपोर्टनुसार, अल-शिफा हॉस्पिटलमध्ये त्यांना इन्क्यूबेटरमध्ये ठेवले होते. येथील वीज इस्रायलने तोडली. सशस्त्र दलांनी हॉस्टिपलला चोहोबाजूनी घेरले आहे. कोणतेही खाद्यपदार्थ, दूध अथवा पाणी आत नेण्यासाठी परवानगी नाही.

दुसऱ्या महायुद्धात होलोकॉस्ट हा युरोपियन ज्यूंचा नरसंहार होता. ज्यू नरसंहार, ज्याला जगभर होलोकॉस्ट म्हणून ओळखले जाते. १९४१ ते १९४५ दरम्यान नाझी जर्मनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जर्मन व्याप्त युरोपमधील सुमारे ६० लाख ज्यूंना गॅस चेंबरमध्ये बंद करून मारले होते.

ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून इस्त्रायल-हमास संघर्ष सुरू झाल्यापासून संजय राऊत सक्रियपणे त्यांचे मत व्यक्त करत आहेत. गेल्या महिन्यात त्यांनी सत्ताधारी भाजप आणि दहशतवादी गट यांच्यात समांतरता दाखवली आणि नंतर सुचवले की केंद्राला पेगासस “स्नूपिंग” सॉफ्टवेअरच्या पुरवठ्यामुळे इस्रायलला भारताचा पाठिंबा आहे.

७ ऑक्टोबर रोजी हमास दहशतवाद्यांनी सीमा ओलांडून इस्रायलवर हल्ले केले. यात सुमारे १,२०० लोकांचा मृत्यू झाला आणि २०० हून अधिक लोकांना ओलिस ठेवण्यात आले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझावरील जोरदार हल्ले केले. यात मोठी जीवितहानी झाली. हमासच्या नियंत्रणाखालील गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायलच्या हल्ल्यात सुमारे ५ हजार मुलांसह १४ हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. (Israel-Hamas war updates)

Back to top button