नवी मुंबई : राजेंद्र पाटील : यावर्षीच्या दिवाळीसणात विक्रमी सोनेखरेदी होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत सोने ३० टक्क्यांनी महागले आहे. तरीही खरेदीदारांनी सढळ हस्ते सोने खरेदी केली. आतापर्यंत मुंबईत ५०० टन सोन्याची विक्री झाली असून, भाऊबीजेपर्यंत त्यात ५० टन विक्रीची आणखी भर पडू शकते. ही एकूण उलाढाल ३३९ कोटी ९० हजार रुपयांची होईल, तर राज्यातील सोने विक्री ७०० टनांवर जाण्याची शक्यता असून, एकूण उलाढाल ४६३ कोटी ५० हजार रुपयांची होऊ शकते, अशी माहिती इंडिया बुलियन ॲण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि झवेरी बाजार संघटनेचे पदाधिकारी कुमार जैन यांनी पुढारीशी बोलताना दिली.
संबंधित बातम्या :
दिवाळीच्या पहिल्या दोन दिवसांत म्हणजे धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी झाली. मुंबई, नाशिक, जळगाव, पुणे, नागपूर, ठाणे, औरंगाबाद, कोल्हापूर शहरांत तुलनेने मोठी उलाढाल झाली. रविवारी सोन्याचा दर हा तोळ्याला ६१ हजार ८०० रुपये होता, तर तीन टक्के जीएसटी म्हणजे १८०० रुपये असा एक तोळे सोने खरेदीसाठी ६३ हजार ६०० रुपये ग्राहकांना मोजावे लागले. गेल्यावर्षी दिवाळीत सोन्याचा दर हा ५० हजार ६०० रुपये होता. म्हणजेच एक तोळ्यामागे १३ हजार रुपये जीएसटीसह सोने महाग झाले आहे.
चालू वर्षात १४ जानेवारी ते १४ जून या सहा महिन्यांच्या कालावधीत लग्नसराईत मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये सोन्याची उलाढाल ७५० कोटी रुपयांची झाली होती. दिवाळीनंतर तुळशीविवाह होताच लग्नसराईला सुरुवात होते. विवाह म्हटले तर सोने खरेदी आलीच. त्यामुळे सोने व्यापारी वर्षभरातील विवाह मुहूर्ताच्या तारखा आधीच काढून ठेवतात. त्यानुसार नियोजनाची आखणी करतात.
हेही वाचा :