Diwali 2023 : जल्लोषी उत्साहात भक्तिभावाने लक्ष्मीपूजन | पुढारी

Diwali 2023 : जल्लोषी उत्साहात भक्तिभावाने लक्ष्मीपूजन

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  आकाशकंदिलांसह नेत्रदीपक विद्युत रोषणाई, सप्तरंगी रांगोळ्या, फुला-पानांच्या माळांनी सजलेले घरदार आणि नवीन कपडे परिधान करून परस्परांना शुभेच्छा देणारे आबालवृद्ध अशा उत्साही आणि आनंदी वातावरणात रविवारी चैतन्यदायी दीपावली पर्वाचा जल्लोषात प्रारंभ झाला. चैतन्यमयी वातावरणात रविवारी लक्ष्मीपूजन पार पडले. पूजेनंतर फटाक्यांच्या आतषबाजीत अवघा आसमंत उजळून निघाला होता. ‘लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास’… या व अशा शुभेच्छा देत दीपोत्सव पर्व सुरू झाले.

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्याने उत्साहात भर पडली होती. शहरात सकाळपासूनच लक्ष्मीपूजनाची लगबग दिसून आली. शहरातील गुलटेकडी मार्केट यार्डासह महात्मा फुले मंडई परिसरात लक्ष्मीची मूर्ती, झेंडूची फुले आणि पूजाविधीचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. सकाळी अभ्यंगस्नान आणि फराळ करून बहुतांश पुणेकर आपले नातलग व परिचितांकडे जाऊन एकमेकांचे अभिष्टचिंतन करताना दिसून आले. दिवाळीच्या पहिल्या दिवसानिमित्त शहरातील प्रमुख मंदिरात देवदर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर मात्र शहरातील प्रमुख रस्त्यांवर फारशी वर्दळ नव्हती. सायंकाळ होताच लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू झाली. मुहूर्तावर घराघरांत आणि जवळपास प्रत्येक दुकानांमध्ये व्यापार्‍यांनी लक्ष्मीची आणि आपल्या हिशोबाच्या

पुस्तकांची पूजा केली. शहरातील व्यापार्‍यांनी दुपारनंतर व्यवहार थांबवून दुकाने सजविण्यास प्राधान्य दिले. लक्ष्मीपूजनासोबतच प्रथेप्रमाणे चोपड्या-वह्या, खातेपुस्तिका आणि दुकानाची साग्रसंगीत पूजा पार पडली. यानिमित्ताने लक्ष्मी रस्त्यासह सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये आनंदोत्सवाचे वातावरण अनुभवायला मिळाले. पूजाविधीनंतर गूळ, लाह्या, बत्ताशासह मिठाईचे वाटप करत व्यापार्‍यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. लक्ष्मीपूजनामुळे अवघे पुणे रोषणाईच्या सप्तरंगात न्हाऊन निघाले होते.

पाडव्यानिमित्त मोठी उलाढाल
मंगळवारी दिवाळी पाडव्यानिमित्त बाजारात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. सोमवारचा दिवस बाकी असल्याने व्यापारीवर्गानेही शोरूममध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मांडल्या होत्या. अनेकांकडून अ‍ॅडव्हान्स बुकिंग करण्यात
येत होते.

Back to top button