Mukesh Ambani Death Threat | मुकेश अंबानींना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी, ४०० कोटींची मागणी | पुढारी

Mukesh Ambani Death Threat | मुकेश अंबानींना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी, ४०० कोटींची मागणी

पुढारी ऑनलाईन : रिलायन्स इंडस्ट्रीजचे (RIL) अध्यक्ष मुकेश अंबानी यांना सोमवारी सकाळी तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी मिळाली. त्यांच्याकडे यावेळी ४०० कोटींची मागणी करण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांना ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळण्याची चार दिवसांतील ही तिसरी वेळ आहे. (Mukesh Ambani Death Threat)

मुकेश अंबानी यांना एक मेल आला असून त्यात सुरक्षा कितीही कडक असली तरी ‘एक स्नायपर’ पुरेसे आहे, असे म्हटले आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

संबंधित बातम्या 

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक असलेल्या अंबानी यांना २७ ऑक्टोबरपासून एकाच ई-मेल आयडीवरून धमकीचे मेल येत आहेत. सर्व धमकीच्या ईमेलमध्ये खंडणीची मागणी करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तिन्ही ई-मेल एकाच ई-मेल आयडीवरून पाठवण्यात आले आहेत आणि ई-मेल पाठवणाऱ्याचे नाव शादाब खान असे आहे. हे ई-मेल बेल्जियममधून पाठवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुकेश अंबानींना आलेला धमकीचा मेल एका बोगस की खऱ्या ईमेल आयडीवरून पाठवण्यात आला आहे, याचा तपास सध्या मुंबई पोलीस करत आहेत. ई-मेल आयडीची माहिती मिळवण्यासाठी पोलीस मेल प्रोव्हायडर कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या ४ दिवसांपासून त्यांना एकाच ई-मेल पत्त्यावरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, सर्व धमकीच्या ईमेलमध्ये खंडणीची मागणी करण्यात आली आहे. (Mukesh Ambani Death Threat)

मुकेश अंबानी यांना ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही तिसरी वेळ आहे. गेल्या आठवड्यात त्यांना ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली होती, ज्यामध्ये असे म्हटले होते की भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीने २० कोटी रुपये द्यावेत अन्यथा त्यांना ठार मारु.

या प्रकरणी गेल्या शनिवारी गावदेवी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आले होते. भारतीय दंड संहिता (IPC) कलम ३८७ (खंडणीसाठी एखाद्या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देणे अथवा गंभीर दुखापत) आणि ५०६ (2) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

गेल्या वर्षी मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बिहारमधील दरभंगा येथून एका व्यक्तीला अटक केली होती. मुंबईतील सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय बॉम्बने उडवून देण्याची धमकीही त्यांनी दिली होती.

हे ही वाचा :

Back to top button