मुकेश अंबानींनी श्रीमंतांच्या यादीत अदानींना टाकले मागे | पुढारी

मुकेश अंबानींनी श्रीमंतांच्या यादीत अदानींना टाकले मागे

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उद्योगपती मुकेश अंबानी यांनी गौतम अदानींना श्रीमंतांच्या यादीत मागे टाकले आहे. ‘हुरून रिच इंडिया’ लिस्ट 2023 या यादीनुसार, रिलायन्सचे सर्वेसर्वा अंबानी हे सर्वात श्रीमंत भारतीय बनले असून त्यांच्या संपत्तीत चार पटींनी वाढ झाली आहे.

हुरून इंडिया आणि 360 वन वेल्थ यांनी संयुक्तपणे भारतातील अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. या यादीत मुकेश अंबानी कुटुंब 8,08,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती 2014 मध्ये 1,65,100 कोटी रुपयांवरून 2023 मध्ये अंदाजे 8,08,700 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. गेल्या नऊ वर्षांत अंबानींच्या संपत्तीत चार पटींनी वाढ झाली आहे.

अदानी दुसर्‍या स्थानावर

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी 4,74,800 कोटी रुपयांच्या मालमत्तेसह दुसर्‍या स्थानावर आहेत. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस पूनावाला 2,78,500 कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीसह तिसर्‍या स्थानावर आहेत. एचसीएलचे शिव नाडर 2,28,900 कोटी रुपयांच्या मालमत्तेसह चौथ्या स्थानावर आहेत. यानंतर 1,76,500 कोटी रुपयांच्या संपत्तीसह गोपीचंद हिंदुजा आणि कुटुंबाचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचे संस्थापक दिलीप संघवी 1,64,300 कोटी रुपयांसह सहाव्या स्थानावर आहेत.

लक्ष्मी मित्तल यांच्या संपत्तीत 7 टक्के वाढ

आर्सेलर मित्तलच्या लक्ष्मी मित्तलच्या संपत्तीत 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ते आता 1,62,300 कोटी रुपयांच्या अंदाजे संपत्तीसह यादीत सातव्या स्थानावर आहेत. डीमार्टचे राधाकिशन दमानी हे 1,43,900 कोटी रुपयांच्या संपत्तीसह यादीत आठव्या क्रमांकावर आहेत.

Back to top button