National Games : वेटलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक! दिपाली गुरसालेची 45 किलो वजनगटात विक्रमी कामगिरी | पुढारी

National Games : वेटलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक! दिपाली गुरसालेची 45 किलो वजनगटात विक्रमी कामगिरी

विठ्ठल गावडे पारवाडकर

पणजी : पुढारी वृत्तसेवा : National Games : 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्र राज्याची खेळाडू दिपाली गुरसाले हिने विक्रमी कामगिरीसह महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले. तिने महिलांच्या 45 किलो वजनगटात अव्वल कामगिरी नोंदवताना एकूण 165 किलो वजन उचलले.

वेटलिफ्टिंग स्पर्धेला बुधवारपासून कांपाल येथील क्रीडानगरीत सुरुवात झाली. पश्चिम बंगालच्या चंद्रिका तडफदार हिने 162 किलो वजन उचलून रौप्य, तर तेलंगणाच्या टी. प्रियदर्शिनी हिने 161 किलोसह ब्राँझपदक पटकावले. (National Games)

सांगली जिल्ह्यातील दिपाली हिने स्नॅचमध्ये 75 किलो वजन उचलून नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. रौप्यपदक विजेत्या चंद्रिकानेही राष्ट्रीय विक्रम नोंदविताना क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये 95 किलो वजन उचलले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विजेत्यांना पदके प्रदान केली व त्यांचे अभिनंदन केले. यावेळी माहिती खात्याचे संचालक दीपक बांदेकर उपस्थित होते.

दरम्यान, पुरुष गटात सेनादलाच्या प्रशांत कोली याने 55 किलो वजन गटात राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक प्राप्त केले. त्याने एकूण 253 किलो वजन उचलले. त्यापैकी स्नॅचमध्ये 115 किलो वजन उचलून त्याने विक्रमाला गवसणी घातली. महाराष्ट्राच्या मुकुंद अहेर याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने 249 किलो वजन उचलले. आंध्र प्रदेशचा एस. गुरू नायडू (230 किलो) ब्राँझपदकाचा मानकरी ठरला.

छत्तीसगडच्या ज्ञानेश्वरीला सुवर्ण (National Games)

महिलांच्या 49 किलो वजनगटात छत्तीसगडच्या ज्ञानेश्वरी यादव हिने सुवर्णपदक जिंकताना एकूण 177 किलो वजन उचलले. हरियाणाच्या प्रीती हिने 174 किलोंसह रौप्य, तर ओडिशाच्या झिल्ली दालाबेहेरा हिने 167 किलोंसह ब्राँझपदक प्राप्त केले.

Back to top button