वाड्ःमय चौर्य : BAMU तील संशोधकाची पीएचडी रद्द; विद्यापीठाच्या इतिहासातील पहिलीच घटना | पुढारी

वाड्ःमय चौर्य : BAMU तील संशोधकाची पीएचडी रद्द; विद्यापीठाच्या इतिहासातील पहिलीच घटना

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वाड्ःमय चौर्य केल्याप्रकरणी कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी किशोर धाबे यांची पीएचडी रद्द केली आहे. संशोधन प्रबंधातील वाड्ःमय चौर्य उघडकीस आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवून पीएच.डी पदवी रद्द करण्याची शिफारस केली होती. त्यावर राज्यपालांनी शिक्कामोर्तब केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ वर्षांच्या इतिहासात पीएच. डी पदवी रद्द होण्याची ही पहिलीच घटना आहे.

दहा वर्षांपूर्वी किशोर निवृत्ती धाबे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत राज्यशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केलेली होती. ‘किनवट तालुक्यातील आदिवासी नेतृत्त्व आणि आदिवासीसाठींच्या कल्याणकारी ध्येय धोरणांची अंमलबजावणी’ हा त्यांचा संशोधन प्रबंधाचा विषय होता. मात्र, या संशोधन प्रबंधात वाड्ःमय चौर्य करण्यात आल्याची तक्रार कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे पुरुषोत्तम रामटेके यांनी पुराव्यासह दाखल केली होती. डॉ. मारोती तेगमपुरे व देशमुख यांच्या शोधप्रबंधातील मजकूर चोरण्यात आल्याचे त्यात म्हटले होते. या तक्रारीनुसार डॉ. धर्मराज वीर, डॉ. शूजा शाकेर व डॉ. मृदुल निळे या तीन सदस्यांची विभागांतर्गत चौकशी समिती (इन्स्टिटयूशनल अकॅडमिक इंटिग्रेटेड पॅनेल) नेमण्यात आली.

या समितीने धाबे यांच्या शोधप्रबंधात ५१ टक्के वाड्ःमयचौर्य झाल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर प्र-कुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय विद्यापीठस्तरीय सत्यशोधन समितीनेही चौकशी केली. त्यांच्या चौकशीत ६५ टक्के वाड्ःमयचौर्य केल्याचे आढळून आले. यानंतर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व विद्या परिषद बैठकीतही सर्वानुमते हा अहवाल स्विकारुन पीएच.डी. रद्द करण्यास संमती देण्यात आली. गेल्या महिन्यात कुलपती रमेश बैस यांच्याकडे या प्रकरणाची सुनावणी झाली. विद्यापीठाच्या वतीने प्रकुलगुरु डॉ. श्याम शीरसाठ, उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा व विधि अधिकारी किशोर नाडे यावेळी ते उपस्थित होते. या सुनावणी नंतर विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय मान्य करुन पीएच.डी. रद्द करण्याचा निर्णय कुलपती यांनी मंजूर केला आहे. या संदर्भात राजभवनचे अप्पर सचिव विकास कुलकर्णी यांनी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांना पत्राद्वारे कळविले आहे.

संशोधनातील वाड्ःमय चौर्य करण्याचा प्रकार गंभीर आहे. अशा घटनांमुळे शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशाप्रमाणे संशोधनाचा दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. पीएच.डी साठीचे निकष आणखी कठोर करावेत, अशी भूमिकाही अनेकवेळा मांडली आहे.
– डॉ. प्रमोद येवले, कुलगुरु

हेही वाचलंत का?

Back to top button