ठाकरे गटात खदखद; नवीन कार्यकारिणीत ‘किचन कॅबिनेट’लाच प्राधान्य, निष्ठावंतांमध्ये नाराजी | पुढारी

ठाकरे गटात खदखद; नवीन कार्यकारिणीत ‘किचन कॅबिनेट’लाच प्राधान्य, निष्ठावंतांमध्ये नाराजी

गौरीशंकर घाळे

मुंबई : पारंपरिक दसरा मेळावा अवघ्या काही दिवसांवर आला असताना शिवसेना ठाकरे गटाने सोमवारी आपल्या मुखपत्रातून नवीन कार्यकारिणी घोषित केली. मात्र, या कठीण काळातही निष्ठेने संघर्ष करणार्‍यांपेक्षा ‘मातोश्री’वरच्या ‘किचन कॅबिनेट’लाच प्राधान्य दिले गेल्याचे चित्र असून, त्यामुळे निष्ठावंतांची तीव्र नाराजी आहे. विशेषतः, सचिवपदावरील वरुण सरदेसाई, साईनाथ दुर्गे आदींच्या नियुक्त्यांमुळे हुजरे आणि बिनकामाची खोगीर भरती सुरू असल्याची तक्रार व्यक्त होत आहे.

खासदार विनायक राऊत, अनिल देसाई, राजन विचारे, आमदार अनिल परब, सुनील प्रभू, रवींद्र वायकर यांच्यावर नेतेपदाची जबाबदारी टाकण्यात आली. तर साईनाथ दुर्गे, वरुण सरदेसाई, सुप्रदा फातर्पेकर यांच्याकडे सचिवपद देण्यात आले आहे. उपनेत्यांच्या भल्या मोठ्या यादीत बंडू जाधव आणि कल्याणमधील विजय साळवी यांची भर पडली आहे.

शिवसेनेत नेता आणि सचिवपद महत्त्वाचे मानले जाते. त्यातही सचिवांच्या हाती एकप्रकारे पक्षाचा सारा कारभार एकवटलेला असतो. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि रश्मी ठाकरे यांच्या भावाचे पुत्र वरुण सरदेसाई आणि त्यांच्या कुटुंबाच्या जवळचे साईनाथ दुर्गे यांना सचिवपद बहाल करण्यात आले आहे. आमदार प्रकाश फातर्पेकर यांची कन्या सुप्रदा यांची सचिवपदी नियुक्तीही संभाव्य बंडाळीला रोखण्याचा प्रकार मानला जात आहे. यापूर्वीही ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांच्या मुलाला अशाच पद्धतीने सचिवपद दिले गेले. त्यानंतर पक्षाच्या ताब्यातील एका बँकेवर त्यांची वर्णी लावून सोय लावण्यात आली. पण, पक्षासाठी त्यांचा काहीही उपयोग होत नसल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. याच पद्धतीने शिंदे गटातील खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मुलाचे झालेले पुनर्वसनही पक्षासह महाविकास आघाडीतील असंतोषाचे कारण बनत आहे.

ठाकरे गटाचे निष्ठावंत विद्यमान खासदार राजन साळवी यांचेही नाव या यादीत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांचे नाव नव्या यादीत नसल्याचे दिसताच एकनाथ शिंदे गटाने त्यांना गळ घालण्यास सुरुवातही केली.

कौटुंबिक दबावामुळे नवे आव्हान

उद्धव ठाकरे यांना कौटुंबिक दबावाला बळी पडावे लागत असल्याची खंत ‘मातोश्री’चा कारभार जवळून पाहणार्‍या पदाधिकार्‍यांच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे. पक्षातील पदे खिरापतीसारखी वाटली जात आहेत. वरुण सरदेसाई, साईनाथ दुर्गे, विजय कदम, आदेश बांदेकर आदी नावे त्याचाच भाग मानली जात आहेत. ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील सरदेसाईंच्या मंत्रालयातील हस्तक्षेपामुळेच एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी रागावले होते; तर आदित्य ठाकरे यांच्या जवळचे असलेले सूरज चव्हाण यांना शिवसेना सचिवपद दिले गेले. सध्या खिचडी घोटाळ्यातील त्यांची चौकशी पक्षासाठी अडचणीची बनली आहे.

हेही वाचा : 

Back to top button