आरक्षणाला तुमचा विरोध कशासाठी? जरांगे-पाटील यांचा वडेट्टीवारांना सवाल | पुढारी

आरक्षणाला तुमचा विरोध कशासाठी? जरांगे-पाटील यांचा वडेट्टीवारांना सवाल

जालना;  पुढारी वृत्तसेवा :  मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर त्याला विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा विरोध का, असा सवाल मनोज जरांगे-पाटील यांनी उपस्थित केला आहे. या आरक्षणाला त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे, अशी अपेक्षाही जरांगे यांनी व्यक्त केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी विरोधी पक्षनेत्यांवर तोफ डागली.

सध्या मराठा आरक्षणाचा विषय ज्वलंत बनला आहे. काहीही झाले तरी आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. मात्र, या विषयाला फाटे फोडले जात आहेत. काही मंडळी यात खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. मराठा समाजातील युवक किती अस्वस्थ बनला आहे हे अंतरवाली सराटी येथे नुकत्याच झालेल्या सभेतून दिसले आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर अन्य कोणाच्या पोटात दुखता कामा नये, असा इशाराही जरांगे यांनी दिला.

आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी आधी समाजाशी चर्चा करणार आहे. यानंतर समाजाने घेतलेल्या निर्णयानुसार आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. त्यासाठी 22 तारखेला आम्ही सर्व समाजाची एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीनंतर निर्णय सर्वांना सांगितला जाईल, असेही त्यांनी सांगितले. मराठा समाजावर प्रस्थापितांमुळेच ही वेळ आली आहे. त्यामुळे आता कोणीही मराठा समाजाच्या आरक्षणात माती कालवू नये, असा इशारा त्यांनी दिला.

Back to top button