मुंबई : कंपनीची ८ कोटी ४९ लाखांची फसवणूक | पुढारी

मुंबई : कंपनीची ८ कोटी ४९ लाखांची फसवणूक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : नातेवाईक आणि मित्राच्या मदतीने कट रचून कंपनीची ८ कोटी ४९ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. खोट्या वेंडर्सची इनव्हाइसेसची कागदपत्रे पाठवून कंपनीला कोणत्याही प्रकारे सेवा न पुरवता कंपनीच्या खात्यातील आठ कोटी ४९ लाख ५९ हजार ४०१ रुपये ऑनलाईन वळते करून कर्मचाऱ्याने एका विमा कंपनीची फसवणूक केली आहे. कंपनीच्या उपाध्यक्षांनी दिलेल्या तक्रारीवरुन याप्रकरणी कंपनीतील कर्मचाऱ्यासह त्याचा मित्र आणि ११ वेंडर्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ना. म. जोशी मार्ग पोलीस करत आहेत.

लोअर परळमध्ये कार्यालय असलेल्या विमा कंपनीमध्ये नवी दिल्लीतील रहिवासी ब्रिजेंद्र सिंग हे २००८ पासून काम करतात. त्यांच्याकडे कंपनीचे वेंडर्स मॅनेजमेंट करणे, त्यांचे पेमेंट करणे अशा कामांची जबाबदारी त्यांच्यावर होती. सिंग यांनी वडीलांचा मोठा व्यवसाय असून वडील वयोवृध्द झाल्याचे कारण देत फेब्रुवारी २०२० मध्ये कंपनीतील पदाचा राजीनाम दिला होता. त्यांना कार्यमुक्त करुन ऑक्टोबर महिन्यापर्यंत कन्सल्टंट म्हणून ठेवण्यात आले.

सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर कंपनीला सेवा पुरविणाऱ्या काही वेंडर्सनी कंपनीला सेवा देणे बंद केले होतो. सिंग आणि या वेंडर्समध्ये पैशाचे व्यवहार झाले असल्याचा कंपनीला संशय आला. त्यानुसार, तपासणी करण्यात आली असता नातेवाईक आणि मित्राच्या मदतीने कंपनीला खोट्या वेंडर्सची इनव्हाइसेसची कागदपत्रे पाठवून कंपनीला कोणत्याही प्रकारे सेवा न पुरवता कंपनीचे आर्थिक नुकसान केल्याचे समोर आले.

सिंग यांनी मित्र धीरज कुमार याच्याशी संगणमत ही फसवणूक केली. कंपनीने सिंग यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत वडील, पत्नी, मेहुणा, मित्र, मित्राची पत्नी अशा नातेवाईकांच्या खात्यात रक्कम वळती केल्याचे सांगितले. यासह त्या पैशातून जमीन, फ्लॅट खरेदी केले. तसेच, काही जणांना कर्ज दिल्याचे सांगितले. अखेर कंपनीने ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात आठ कोटी ४९ लाख ५९ हजार ४०१ रुपयांच्या आर्थिक फसवणूकीची तक्रार दिली आहे.

हेही वाचा :

Back to top button