पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे भारतात आणण्याचा तीन वर्षांचा करार करण्यात आला आहे. मुंबई, सातारा, नागपूर आणि कोल्हापूरमध्ये ही वाघनखे नेण्यात येणार आहेत. राज्यात जे आजपर्यंत टवाळखोर होते, पण आज ते शंकेखोर झाले आहेत. ज्यांनी प्रश्न उपस्थित केले, त्या शंकाखोरांचा कोथळा आम्ही बाहेर काढणार आहोत, अशा शब्दांत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता निशाणा साधला. (Ashish Shelar)
आम्ही वाघनखांच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. ज्यांच्यामध्ये शंकेची कीड वळवळत आहे, त्यांनी हे व्याख्यान ऐकण्यासाठी यावे. आम्ही स्पष्टीकरण देत नाही, तर सत्य मांडण्याचा प्रयत्न करत आहे, असेही शेलार यांनी आज (दि११) प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. (Ashish Shelar)
आशिष शेलार पुढे म्हणाले की, काही जणांकडून विशिष्ट वर्गाची मते मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शंका उपस्थित करणाऱ्यांना इतिहास माहीत नाही. त्यामुळे वापरलेल्या वाघनखावर शंका उपस्थित केल्या जात आहे. हे सर्व नियोजितपणे सुरू आहे. परंतु, महाराष्ट्राची जनता हे सर्व पाहत आहे. आजही मोहमद अली रोडवरील बोर्डवर कुणी काळे फासत नाही. पण आज गुजराती पाट्यांची तोडफोड केली जात आहे. मोहमद अली रोडवर असलेल्या उर्दू आणि पारशी बोर्डांची तोडफोड करून दाखवा, असे आव्हान शेलार यांनी विरोधकांना दिले.
हेही वाचा