NCP Jayant Patil | …तर मुलगा वडिलांना घरातून बाहेर काढत नाही; जयंत पाटील यांची पोस्ट चर्चेत | पुढारी

NCP Jayant Patil | ...तर मुलगा वडिलांना घरातून बाहेर काढत नाही; जयंत पाटील यांची पोस्ट चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची? शरद पवार की अजित पवार गटाची, या वादावर शुक्रवार (दि.७) पासून निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू झाली. या सुनावणीसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे स्वतः निवडणूक आयोगासमोर हजर झाले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलत असताना खोचक टिपण्णी केली. या टिपण्णीनंतर राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. (NCP Jayant Patil)

संबधित बातम्या

सुनावणीला शरद पवार हजर; प्रफुल्ल पटेल यांची अनुपस्थिती

अजित पवार गटाने आपलाच गट खरी राष्ट्रवादी असल्याचे सांगताना, शरद पवारांनी मनमानी पद्धतीने पक्ष चालविला असून प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची केलेली नियुक्ती बेकायदेशीर आहे, असा दावा केला; तर अजित पवार गटाच्या दस्तावेजांमधील त्रुटींच्या आधारे शरद पवार गटाने युक्तिवाद केला. सोमवारी (९ ऑक्टोबर) पुढील सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे, या सुनावणीसाठी पक्षाचे नेते शरद पवार हे स्वतः निवडणूक आयोगासमोर हजर झाले होते. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल हे दिल्लीत होते. परंतु आयोगासमोर ते पोहोचले नाहीत.

NCP Jayant Patil :…याच्यातच सगळं आलं

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे की,”आदरणीय शरद पवार साहेबांच्या कार्यशैलीतूनच मोठी झालेली ही लोकं आहेत. आज तीच लोकं पवार साहेबांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करत आहे. घरातील लहान मुलगा जेव्हा मोठा होतो, त्याला स्वतंत्र व्हायचं असतं त्यावेळी तो स्वतःचं घर बांधतो. तो वडिलांना घरातून काढत नाही. याच्यातच सगळं आलं”

दोन गटांची ‘दावे’दारी

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, अनुपचंद्र पांडेय आणि अरुण गोयल यांच्यासमोर जवळपास दोन तास सुनावणी चालली. शरद पवार गटातर्फे ज्येष्ठ विधिज्ज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली; तर अजित पवार गटातर्फे कायदेतज्ज्ञ नीरज किशन कौल, सिद्धार्थ भटनागर, मनिंगरसिंग आणि सिद्धार्थ धर्माधिकारी आयोगासमोर हजर झाले होते. सुनावणीतील शरद पवार व अजित पवार गटाचे महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे

शरद पवार गटाचा दावा

  • अंतिम निर्णय येईपर्यंत चिन्ह गोठवू नका, तोपर्यंत चिन्ह आमच्याकडे ठेवा.
  • शरद पवार यांची निवड पक्षाच्या घटनेला धरून. त्यामुळे त्यांचे निर्णय डावलता येणार नाहीत.
  • 24 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा शरद पवार यांना पाठिंबा.
  • अजित पवार गटाची भूमिका पक्षाच्या विचारांच्या विरोधात.
  • कागदपत्रांच्या आधारे पक्ष आणि चिन्हावर आमचा दावा.
  • एक गट बाहेर पडला. मूळ पक्ष आमच्याकडेच आहे.
  • शरद पवार पक्षाचे संस्थापक. त्यामुळे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार शरद पवार यांना.

अजित पवार गटाचा दावा

  • पक्षाचे सर्वाधिक संख्याबळ, विधिमंडळ आणि संसदीय बहुमत आमच्याकडे.
  • पक्ष आणि चिन्हाचा विचार करताना संख्याबळाचा विचार व्हावा.
  • राष्ट्रीय दर्जा गेल्याने आमदारांची संख्या महत्त्वाची. त्याआधारे पक्ष ठरवता येईल.
  • 10 जुलैला प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती निवडणूक आयोगाला कळवली होती.
  • शरद पवार त्यांच्या मर्जीनुसार पक्ष चालवतात, पक्षात लोकशाही नव्हती.
  • तुम्ही शिवसेनेला जसा निर्णय दिला तसाच निर्णय आम्हाला द्या.
  • विधानसभेतील 42 तसेच विधान परिषदेतील 6 आमदार आणि लोकसभेतील 1 आणि राज्यसभेतील 1 खासदार आपल्याकडे.

Back to top button