

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भाजपने ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करीत अनेकांना त्रास दिल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला निवडणुकीसाठी 'कमळ' ऐवजी 'वॉशिंग मशिन' चिन्ह घ्या, असा खोचक सल्ला गुरुवारी दिला. दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत बोलताना त्यांनी चिन्ह बदलले तरी लोक निर्णय बदलत नाहीत. निवडणूक चिन्ह बदलण्याचे काही जणांचे षड्यंत्र असू शकते. परंतु कुठे बटण दाबायचे हे सर्वसामान्यांना कळते, अशा शब्दांत अजित पवार गटाला फटकारले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फाटाफुटीनंतर पक्षावर हक्क कोणाचा यावर शुक्रवारी निवडणूक आयोगापुढे सुनावणी होणार आहे. त्याआधी शरद पवार गटाने दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसची विस्तारित कार्यकारिणीची बैठक घेऊन शक्ती प्रदर्शन केले. या बैठकीमध्ये शरद पवार हेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष असल्याचा आणि त्यांच्या नेतृत्वावर सर्वांचा विश्वास असल्याचा ठराव देखील एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच बिहारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना देशभरात व्हावी, अशी मागणीदेखील कार्यकारिणी बैठकीत झाली. विस्तारित कार्यकारिणी बैठकीसाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना शरद पवार यांनी, कार्यकारिणीने आज संमत केलेला प्रस्ताव हा फुटीर गटाला उत्तर आहे, असा टोला लगावला. निवडणूक आयोगाने निर्णय देण्याआधीच पक्ष सोडून गेलेली मंडळी आपल्यालाच निवडणूक चिन्ह, पक्ष मिळण्याचा दावा करत आहेत. कायद्याने निर्णय झाला तर सत्याचा विजय होईल, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये सर्वांच्या हल्ल्याचा रोख प्रफुल्ल पटेल यांच्यावर होता. अजित पवार यांचे कोणीही नाव घेतले नाही. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंदमानच्या प्रदेश अध्यक्षा उमा भारती यांनी व्यासपीठावरूनच 'प्रफुल्ल पटेल मुर्दाबाद' अशी घोषणा दिली. शरद पवार यांनीही थेट नाव घेण्याचे टाळले असले तरी, विरोध करणाऱ्यांनीच पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये आपली बिनविरोध निवड करण्याचा प्रस्ताव दिला होता, हा त्यांचा उल्लेख प्रफुल्ल पटेल यांच्याकडे अंगुलीनिर्देश करणारा होता…