Nanded Hospital death: नांदेडमधील रुग्णांचे आरोग्यमंत्रीच मारेकरी, त्यांनी राजीनामा द्यावा: वर्षा गायकवाड | पुढारी

Nanded Hospital death: नांदेडमधील रुग्णांचे आरोग्यमंत्रीच मारेकरी, त्यांनी राजीनामा द्यावा: वर्षा गायकवाड

मुंबई : पुढारी वृत्तसेवा: नांदेड येथील सरकारी रुग्णालयापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात रुग्ण मृत्युमुखी पडल्याची घटना गंभीर आहे. सत्तेसाठी इतर पक्षांमधील नेते फोडून आपल्या पक्षाच्या दावणीला बांधण्यात व्यग्र असलेल्या शिंदे सरकारला जनसामान्यांच्या प्रश्नांशी काहीच देणेघेणे नाही. या घटनेवरून आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असून आरोग्यमंत्री हेच रुग्णांचे मारेकरी आहेत, असा आरोप करत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केली.(Nanded Hospital death)

ऑगस्ट महिन्यात कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात २४ तासांत १७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर गेल्या दोन दिवसांमध्ये नांदेडच्या शंकरराव चव्हाण सरकारी रुग्णालय आणि छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालय येथे एकूण ४३ रुग्ण दगावले. या मृत्युकांडामुळे आरोग्य व्यवस्थेची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत. सरकारला विरोधकांच्या टीकेला व सर्वसामान्यांच्या रोषाला तोंड द्यावे लागत आहे. या घटनेवरून वर्षा गायकवाड यांनी सरकारवर निशाणा साधला. सरकारी रुग्णालयातील घटनांना शिंदे सरकार आणि आरोग्यमंत्र्यांची निष्क्रियता कारणीभूत आहे, अशी टीका करत लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना सत्तेत रहाण्याचा अधिकार नाही, असा घणाघातही त्यांनी केला. (Nanded Hospital death)

राज्यातील आरोग्य व्यवस्थेकडे किती गांभीर्याने लक्ष द्यायला हवे, हे कोरोना काळातच अधोरेखित झाले होते. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने परिस्थिती उत्तम हाताळली होती. मात्र, गेल्या वर्षभरापासूनच राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा 

Back to top button