न्यायदेवतेच्या दारातच पुन्हा अंधश्रद्धा; कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात कुंकवाने माखलेले लिंबू फेकले | पुढारी

न्यायदेवतेच्या दारातच पुन्हा अंधश्रद्धा; कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात कुंकवाने माखलेले लिंबू फेकले

महेंद्र कांबळे/शंकर कवडे

पुणे : शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात कुंकवाने माखलेल्या लिंबाचा उतारा फेकल्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरातील न्यायव्यवस्थेच्या दारातच अंधश्रद्धेच्या घटना घडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तीन वर्षांपूर्वी असाच अंधश्रद्धेचा घडलेला प्रकार न्यायालय व प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानंतर असे अघोरी प्रकार थांबले होते. परंतु, आता अंधश्रद्धेच्या प्रकारांनी पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरुवात झाल्याचे ताज्या घटनेतून दिसून आले आहे. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातच कौटुंबिक न्यायालयाची इमारत आहे. आतील भागात हे लिंबू टाकले होते.

तीन वर्षांपूर्वीही कौटुंबिक न्यायालयाच्या पहिल्या मजल्यावरील पायर्‍यांवर अशा पध्दतीने लिंबाचा उतारा फेकलेला आढळून आला होता. हे प्रकरण माध्यमांनी उचलून धरल्यानंतर असे प्रकार बंद झाले होते. अशी अंधश्रध्दा घडण्याच्या कारणांबद्दल काही विधिज्ञांशी चर्चा केली. कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात मागेही असे प्रकार झाल्याचे पाहिले असल्याचे त्यांनी सांगितले. ’प्रामुख्याने कौटुंबिक कलहात पती-पत्नी हे पिडलेले असतात. कधी कधी प्रतिवादी, कधी वकील, कधी न्यायालयातील स्टाफ उपलब्ध नसल्याने अशा प्रकरणांमध्ये ‘तारीख पे तारीख’चा अनुभव येतो.

तर निकाल आपल्या बाजूने लागावा, यासाठी अशांना मांत्रिक मानसिक आधार देऊन उतार्‍याचा सल्ला देतात. त्यानंतर न्यायालयाच्या आवारात असे उतारे अंधश्रद्धेपोटी टाकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही,’ असेही एका विधिज्ञाने सांगितले. कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात सुरक्षाव्यवस्था, त्याचबरोबर सीसीटीव्ही असताना अशा पध्दतीने कोणी उतारे टाकले, याचा शोध घेणे गरजचे आहे. प्रथमदर्शनी जादूटोण्याचाच हा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

न्यायालयात खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी वादी-प्रतिवादी (पती-पती) विविध क्लृप्त्या लढवत असतात. निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी अघोरी प्रथेचा म्हणजे उतारा टाकण्याचा प्रकार करतात. कौटुंबिक न्यायालयातील गेटजवळील सीसीटीव्हीच्या मागील बाजूस कुंकवाने माखलेले लिंबू टाकले असल्याचे दिसले. अंधश्रध्देच्या अशा घटनांना खतपाणी घालणार्‍यांवर वेळीच पोलिसांकडून कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

                                          – अ‍ॅड. वाजेद खान (बीडकर)

अजूनही लोक अंध्दश्रध्देत आहेत. पुन्हा अशी घटना घडली, तर त्यांच्यावर अंधश्रध्दा प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई केली जाईल. अशी घटना घडू नये, याकरिता वकिलांनी देखील आपल्या पक्षकारांचे प्रबोधन करावे. लिंबाने, उतार्‍याने याचा कुठलाही निकालावर परिणाम होत नाही. 22 व्या शतकात डिजिटल युगात आपण वावरत आहोत. अंधरूढी कशा पध्दतीने बंद होतील, यासाठी वकिलांनी देखील प्रयत्न करावेत. कायद्याचीही कडक अंमलबजावणी करावी, याबाबत आम्ही पोलिसांना निवेदन देणार आहोत.

                         – वैशाली चांदणे, अध्यक्ष, पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन

Back to top button