पुणे: अघोरी प्रकारामुळे इंदापूर हादरले! २१ वर्षीय तरुणास मानवी विष्ठा खाण्यास लावली, काटी गावातील घृणास्पद कृत्य | पुढारी

पुणे: अघोरी प्रकारामुळे इंदापूर हादरले! २१ वर्षीय तरुणास मानवी विष्ठा खाण्यास लावली, काटी गावातील घृणास्पद कृत्य

इंदापूर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: लग्नाचा आणि हुंड्याचा वाद विकोपाला गेल्याने एका २१ वर्षीय युवकाला मारहाण करण्यासह लिंबू हळद लावून शिव्या शाप देत त्याला आरोपी लज्जास्पद कृत्य करण्यास भाग पडले. तसेच त्या युवकाला मानवी विष्ठा खाण्यास आणि लघवी पिण्यास भाग पाडल्याचा अघोरी प्रकार इंदापूर तालुक्यातील काटी येथे घडला आहे. या प्रकरणी ११ जणांच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये ४ महिलांचाही समावेश आहे.

याबाबत फलटण येथील युवकाने इंदापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादनुसार, फिर्यादीचे ३ वर्षांपूर्वी आरोपीच्या मुलीशी जमलेले लग्न हुंड्यामुळे फिस्कटले होते. दरम्यान, या प्रकरणात वाद विकोपाला गेल्यानंतर पाच लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी करत आरोपींनी फिर्यादी युवकाला मारहाण केली. देवाच्या नावाने आरडाओरडा करत फिर्यादीला लिंबू, हळद लावून शिव्या शापही दिला. त्यानंतर जबरदस्तीने नवरी मुलीसह आरोपी महिलांशी लज्जास्पद कृत्य करायला लावले. तसेच मानवी विष्ठा आणि लघवी पिण्यासारखे घाणेरडे कृत्य करण्यास फिर्यादीला भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. एका आरोपी महिलेने या सर्व घटनेचा व्हिडिओ बनवून तो आपल्या फेसबुकवर शेअर केल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे. त्यामुळे आरोपींवर आयटी ॲक्टचे ६७ अ कलम देखील लावण्यात आले आहे.

आरोपींनी फिर्यादीच्या आईसमोर सीमा ओलांडली

फिर्यादी ऊसतोड मजूर असून लाखोंच्या हुंड्यामुळे हे लग्न मोडले होते. परिणामी मुलीचे कुटुंबीय इतर ठिकाणी तीचे लग्न करणार असल्याने फिर्यादी युवक आणि संबंधित मुलगी लग्नाच्या ऐन एक दिवस आधी (१० एप्रिल) घरातून पळून गेले होते. मात्र, आरोपींनी दोघांनाही पकडून जबरदस्तीने काटी गावात आणले. आरोपींनी फिर्यादीच्या आईसमोरच वरील सर्व घाणेरडे कृत्य घडवून आणले आणि त्याचे व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर शेअर केले.

आरोपींमध्ये स्वप्नाली कासलिंग शिंदे, दीदी अजय पवार, वंदना बापूराव शिंदे आणि मंदा काळे या 4 महिलांसह दिनेश शिंदे, बापूराव शिंदे, कासलिंग बापूराव शिंदे, अजय पवार, लखन काळे, दिनेश शिंदे यांचा मुलगा (सर्व रा. काटी, ता. इंदापूर) आणि अतुल काळे (रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशा 7 पुरुषांचा समावेश आहे. या आरोपींपैकी तीन जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून, चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर तिघांचीही रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस करित आहेत.

 

Back to top button