

नवी मुंबई; पुढारी वृतसेवा : onion rate : राज्यात किरकोळ बाजारात कांद्याने उचल खाल्ली असून पन्नाशी गाठली.यामुळे कांद्याचे दर आटोक्यात आणण्यासाठी नाशिक जिल्ह्यात गेल्या महिन्यात सहा कांदा व्यापा-यावर आयकर विभागाने धाडी घातल्या होत्या.त्यानंतर आता मुंबईतील चार निर्यातदारांनी थेट 59 कंटेनर इराणचा कांदा मुंबईत मागवला.त्यापैकी 24 कंटेनर एपीएमसी मार्केट यार्डात दाखल झाले असून या कांद्याची प्रतवारी करण्याचे काम सध्या सुरू आहे. सोमवारी हा कांदा एपीएमसी घाऊक बाजारात विक्रीसाठी दाखल होणार आहे.
राज्यात गेल्या महिन्यात कांद्याने किरकोळ बाजारात 35 रूपये किलोवरून 50 रूपयेपर्यंत मजल मारली. तर घाऊक बाजारात 28 ते 38 रूपये दर होता. विशेष म्हणजे कांदा उत्पादक ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सर्वच घाऊक एपीएमसी बाजारपेठत आवक ही कमी होत असताना मागणी वाढली होती. यामुळे कांद्याचे दर नाशिक जिल्ह्यात ही 35 ते 40 रूपये झाले होते. साहजिकच मुंबईत त्याचा परिणाम जाणवू लागला. त्यानंतर केंद्राने आयकर विभागाकडून सहा निर्यातदारांवर धाडसत्र घालून कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर नाफेड मार्फत कांदा विक्रीसाठी पाठविण्यात आला.
गेल्या आठवड्यात बफर स्टाॅक केलेला कांदा विक्रीसाठी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे बाजारभाव सर्वसामान्यांचा आवाक्यात राहिले याची काळजी घेण्यात आली. असे असताना मुंबईतील चार बड्या निर्यातदारांनी थेट इराणचा 59 कंटेनर कांदा मुंबईत मागवला.त्यापैकी 24 कंटेनर कांदा जेएनपीटी बंदरातुन नवी मुंबई एपीएमसी मार्केट यार्डात दाखल झाला. तर 35 कंटेनर कांदा अजून जेएनपीटी बंदरात क्लेरिंगसाठी अडकून आहे. एपीएमसी मार्केट यार्डात दाखल झालेला कांदा सध्या महिला कामगारांमार्फत प्रतवारी करण्याचे काम सुरू आहे.
हा कांदा सोमवारी एपीएमसीत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्याचा दर हा सोमवारी खुलता बाजार भावावर ठरणार आहे. एका कंटेनर मध्ये सुमारे 20 टन कांदा असतो. एकूण 59 कंटेनर मध्ये 1180 टन इराणचा कांदा येत्या तीन दिवसात मुंबईत येईल. हा कांदा मुंबईसह दिल्ली,गुजरात, अहमदाबाद, पंजाब,राजस्थान, मध्य प्रदेश, दक्षिण भारतातील राज्यात पाठवला जाणार आहे. हा कांदा फार काळ टिकाऊ नाही. हाॅटेल व्यावसायिक त्याची खरेदी करतात. इराणचा कांदा मुंबईत आल्यामुळे त्याचा राज्यातील कांद्याच्या दरावर कुठला ही परिणाम होणार नसल्याची माहिती घाऊक कांदा व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली. राज्यातील कांद्याला तेजी असून तो पुढच्या आठवड्यात चाळीशी पर्यंत पोहचेल अशी माहिती त्यांनी दिली.