Mohit Bharatiya : 'राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सुनील पाटील हाच आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाईंड' | पुढारी

Mohit Bharatiya : 'राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सुनील पाटील हाच आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाईंड'

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

आर्यन खानसह क्रुझवरील अन्य लोकांना अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) जाळ्यात अडकवण्यात सुनील पाटील या व्यक्तीने मास्टरमाईंडची भूमिका पार पाडली. सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच कार्यकर्ता असून तो माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पूत्र ऋषिकेश देशमुख यांचा अत्यंत जवळचा मित्र आहे. राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांशीही सुनील पाटीलचे जवळचे संबंध आहेत, असा दावा भाजपचे नेते मोहित भारतीय यांनी केला. (Mohit Bharatiya)

सुनील पाटीलने 1 ऑक्टोबरला सॅम डिसोझाला फोन केला होता. मुंबईत क्रुझ पार्टी होणार असून त्यामध्ये सहभागी होणार्‍या 27 लोकांची माहिती माझ्याकडे असल्याचे सुनील पाटीलने सॅम डिसोझाला सांगितले. तसेच मला एनसीबीच्या अधिकार्‍याशी बोलायचे आहे, असेही सुनील पाटीलने सांगितले.

देशाच्या भल्याचे काम करण्याच्या हेतूने सॅम डिसोझाने सुनील पाटीलचा एनसीबीचे अधिकारी व्ही. व्ही. सिंग यांच्याशी संपर्क साधून देण्याचे मान्य केले.

Mohit Bharatiya : हा सगळा कट सुनील पाटील यानेच रचला होता

एनसीबीच्या अधिकार्‍यांनी तुमच्याकडे कोणती माहिती आहे, अशी विचारणा केली. तेव्हा सुनील पाटील याने त्याचा सहकारी के. पी. गोसावी याच्याकडे क्रुझ पार्टीशी संबंधित माहिती असल्याचे सांगितले. पाटीलने सॅमला गोसावीचा नंबरही पाठवला आणि किरण गोसावीच सर्व कारवाई करणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे हा सगळा कट सुनील पाटील यानेच रचला होता.

सुनील पाटील हा महाराष्ट्रातील कोणत्या मंत्र्याच्या इशार्‍यावर हे सगळे काम करत होता, असा सवाल मोहित भारतीय यांनी उपस्थित केला.

Back to top button