‘बंडानंतर आमदारांची घरे पेटविण्याचा ‘मातोश्री’वरून आदेश’ | पुढारी

'बंडानंतर आमदारांची घरे पेटविण्याचा ‘मातोश्री’वरून आदेश'

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व कद्रू प्रवृत्तीचे आहे. मुख्यमंत्रिपदाच्या कालावधीत त्यांनी कधीच आमदारांना भेट दिली नाही. शिवसेनेचा आमदार असूनही निधीपासून वंचित ठेवले. त्यामुळेच सर्व आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरीचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर बंडखोरी केलेल्या आमदारांची घरे पेटवा. प्रसंगी एखादा खूनसुद्धा करा, असे आदेश ‘मातोश्री’वरून देण्यात आले, असा खळबळजनक आरोप संपर्कप्रमुख आ. सदा सरवणकर यांनी केला.

शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांचा मेळावा शाहू स्मारक भवनात झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर प्रमुख उपस्थित होते.

आ. सरवणकर म्हणाले, मातोश्री आणि शिवसेना भवनातून कट्टर शिवसैनिकांवर नेहमीच अन्याय करण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फक्त घरासाठी राजकारण केले. त्यातूनच शिवसेनेचे नाव पुसण्याचे काम त्यांनी केले. त्यांना फक्त आदित्य ठाकरे यांना मोठे करायचे आहे. त्यातूनच ठाकरे यांच्यासह खा. संजय राऊत, मिलिंद नार्वेकर यांनी आपल्याच आमदारांना ताकद देण्याऐवजी त्यांचे पंख छाटण्याचे काम केले. त्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसेनेची आज ही खेदजनक स्थिती झाली आहे.

क्षीरसागर म्हणाले, ‘मातोश्री’त बसून काही चांडाळचौकटीने पक्षाचे वाटोळे केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व आमदारांनी क्रांती केली.

हेही वाचा : 

Back to top button