

पुढारी ऑनलाईन डेस्क : मंत्रालयातून मराठा आंदाेलकांवर लाठीमार करण्याचे आदेश दिल्याचा आराेप विरोधी पक्षांकडून आमच्यावर हाेत आहे. आमच्यावरील आराेप सिद्ध केल्यास, आम्ही तिघेजण राजकारण सोडू, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विराेधी पक्षांच्या नेत्यांना दिले. आराेप सिद्ध झाले नाही तर विराेधकांनी राजकारण साेडावे, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की, "जेव्हा राज्यात अशा घटना घडतात, तेव्हा याचे राजकारण केले जाते, हे दुर्दैवी आहे. मराठा आरक्षणाला गालबोट लावण्याचा काहींचा प्रयत्न आहे. मराठा आरक्षणाबाबत समाजात गैरसमजत पसरवले जात आहेत. काही जणांकडून मंत्रालयातून लाठीमाराचे आदेश आले असल्याचा आरोप केला जातोय, त्यांनी हे सिद्ध करून दाखवावे."
शांततेच्या मार्गाने देखील आंदोलन करण्यात येते. त्यामुळे राज्यातील सर्व मराठा समाज बांधवांना आणि मराठा संघटनांना आरक्षणासाठी हिंसेच्या मार्गाचा अवलंब करू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार केले आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या न्यायालयात आहे. देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पहिल्यापासूनच आग्रही आहेत. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी स्वत: फडणवीसांचे प्रयत्न आहेत. सरकार मराठा आरक्षणासंदर्भात गंभीर आहे. आज झालेल्या बैठकीतही सकारात्मक चर्चा झाली आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.