Kolhapur Maratha Andolan : जालना घटनेच्‍या निषेधार्थ उद्या कोल्‍हापूर शहर बंद | पुढारी

Kolhapur Maratha Andolan : जालना घटनेच्‍या निषेधार्थ उद्या कोल्‍हापूर शहर बंद

कोल्‍हापूर : पुढारी वृत्तसेवा :  जालना जिल्‍ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्‍या अमानुष लाठीमार आणि गोळीबाराच्‍या निषेधार्थ मंगळवारी (दि. ५) कोल्‍हापूर शहर बंद ठेवण्‍यात येणार आहे. सोमवारी दसरा चौकात सकल मराठा समाजातर्फे झालेल्‍या जबाब दो आंदोलनात हा निर्णय घेण्‍यात आला. मंगळवारी सकाळी दहा वाजता दसरा चौकात आंदोलक जमणार आहेत. Kolhapur Maratha Andolan)

एसटी केएमटी, रिक्षा, व्‍यापारी व्‍यावसायिक आणि सर्व फेरीवाल्‍यांनी बंद ठेवून कडकडीत बंद पाळावा, असे आवाहन यावेळी करण्‍यात आले. बंदच्‍या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी दहा वाजता दसरा चौकात एकत्र येण्‍याचा निर्णयही यावेळी घेण्‍यात आला. दसरा चौकातून मोटर सायकल रॅलीव्‍दारे बंदचे आवाहन करण्‍यात येणार आहे. (Kolhapur Maratha Andolan)

जालना येथे झालेल्‍या गोळीबार आणि लाठीहल्‍ल्‍याचा जाब विचारण्‍यासाठी सकल मराठा समाजातर्फे सोमवारी जबाब दो आंदोलन करण्‍यात आले. दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करुन आंदोलनाची सुरुवात झाली. ‘जबाब दो, जबाब दो’ या घोषणेसह विविध घोषणाबाजी करुन आंदोलनाची व्‍याप्‍ती वाढविण्‍यात आली. सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि महिलांची संख्‍या लक्षणीय होती.

संबंधित बातम्या

यावेळी बोलताना समन्‍वयक वसंतराव मुळीक म्‍हणाले, छत्रपती शाहू महाराज यांनी सर्व समाजघटकांना आरक्षण दिले. मात्र स्‍वातंत्र्यानंतर मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही. गेल्‍या अनेक वर्षापासून मराठा समाज आंदोलन करीत आहे. मराठ्यांचे आरक्षण सर्वोच्‍च न्‍यायालयात अडकले आहे. जालना येथे सात दिवस आंदोलक शांततेच्‍या मार्गाने उपोषण करीत असताना आंदोलकांची प्रकृती खालावल्‍याचा कांगावा करुन आंदोलनस्‍थळी मंडपात पोलीस घुसविण्‍यात आले.

शांततेत आंदोलन सुरु असताना प्रचंड पोलीस बंदोबस्‍त ठेवून १५ किमी परिसर बंदीस्‍त करण्‍याचे कारण काय ? लाठीहल्‍ल्‍याचा गोळीबाराचा आदेश कोणी दिला ? हे सरकार का सांगत नाही ? असे विविध प्रश्‍न उपस्‍थित करुन मुळीक म्‍हणाले की, मराठा समाजाने आजपर्यंत संयमाने आंदोलन केले आहे. लाखोंचे मोर्चे काढले आहेत. मात्र, आमचा संयम संपल्‍यास काय होईल, याचा सरकारने विचार करावा. आंदोलन चिरडण्‍याचे कारण काय कुणाची सुपारी घेऊन आंदोलन मोडून काढण्‍याचे प्रयत्‍न सुरु आहेत, असा संतप्‍त सवालही मुळीक यांनी केला.

या घटनेवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काहीच बोलत नाही. उलट माझ्‍या कारकिर्दीत आरक्षण दिल्‍याचे सांगतात, मग हे आरक्षण सदावर्तेमुळे गेले सदावर्ते कुणाचा, असा सवाल करुन गृहमंत्र्यांनी इकडे एकदा तिकडे एकदा न करता भूमिका स्‍पष्‍ट करावी, अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली.

Kolhapur Maratha Andolan : आंदोलनकर्त्यांच्या  प्रमुख मागण्‍या

जालना जिल्‍हा पोलीस अधीक्षक व उपअधीक्षकांना निलंबित करावे, जालना गोळीबार आणि लाठीमारासह संपूर्ण घटनेची न्‍यायालयीन चौकशी करावी, या अमानुष घटनेची जबाबदारी स्वीकारुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची माफी मागून राजीनामा द्यावा.

* शांततेत आंदोलन सुरु असताना उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडल्‍याचा कांगावा करुन आंदोलनात हस्‍तक्षेप करण्‍यामागचा मास्‍टरमाईड कोण ?

* लाखोंच्‍या मोर्चावेळी विनालाठी असणारे पोलीस जालना आंदोलनस्‍थळी हेल्‍मेट, लाठीकाठी अश्रूधूर नळकांड्या हत्‍यारधारी यंत्रणा कशासाठी ?

* आंदोलन थांबवायचे होते तर प्रशासनाने आंदोलकांना मंडप खाली करण्‍याची पूर्वसूचना दिली होती का ?

* आंदोलनस्‍थळी भजन, हरिपाठ सुरु असताना महिला मुलांची संख्‍या लक्षणीय असताना पोलीस दडपशाही करुन पोलीस मंडपात का घुसले ?

* लाठीहल्‍ल्‍यात पोलीस वाटेल तसे लाठ्या मारत होते. गुराढोरांपेक्षा वाईट मारहाण केली हे कोणत्‍या कायद्यात बसते ?

* जिल्‍हाधिकारी, पोलीस अधीक्षक घटनास्‍थळी होते का ? परिस्‍थितीचे कोणते आकलन करुन लाठीमार गोळीबार केला ?

* घटनेनंतर मराठ्यांची कशी जिरवली, अशी भाषा करणार्‍या अधिकार्‍याचा शोध घेतला का ?

* शांततेत चाललेले मराठा आरक्षण आंदोलन मोडीत काढण्‍याची सुपारी कोणी घेतली होती ?

* पोलीस अधीक्षक व उपअधीक्षकांवर निलंबनाऐवजी बदली करण्‍यामागे गौडबंगाल काय ?

* या घटनेची नैतिक जबाबदारी गृहखात्‍याने का घेतली नाही, अथवा दिलगिरीही व्‍यक्‍त का  केली नाही

हेही वाचा 

Back to top button