

पुढारी ऑनलाईन डेस्क : "जालन्यातील घटना दुर्दैवी आहे. पोलिसांनी लाठीचार्जचा उपयोग केला, अशा प्रकारच्या बळाचा वापर करण्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. मी मुख्यमंत्री असताना कधीही बळाचा वापर केला नाही. आताही त्याचा वापर करण्याची गरज नव्हती. या घटनेत जखमी झालेल्यांची शासनाच्या वतीने क्षमा मागतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाबाबत आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
"जालन्यातील घटनेची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. जाणीवपूर्वक लाठीचार्जचे आदेश मंत्रालयातून आले, अशी वक्तव्य केली जात आहेत. मात्र लाठीचार्जचे आदेश देण्याचा अधिकार एसपींचा असतो. ज्यावेळी ११३ निष्पाप गोवारी पोलिसांच्या हल्ल्यात मारले गेले, तो आदेश कोणी दिला होता, तो मंत्रालयातून आला होता का? मावळ शेतकरी गोळीबाराचे आदेश मंत्रालयातून आले होते का?" असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. "ही घटना चुकीचीच आहे. मात्र राजकारण करून हे सर्व सरकारच करत आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. उद्धव ठाकरे वटहुकुम काढा असे सांगतात ते एक वर्ष एक महिना मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी वटहुकूम का काढला नाही. निव्वळ राजकारण करण्याचा हा उद्योग आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
ओबीसी समाजाला ज्या-ज्या सवलती आहेत, त्या सर्व सवलती मराठा समाजाला दिल्या आहेत. सरकार मराठा आरक्षणाबाबत अतिशय गंभीर आहे. मराठा आरक्षणासाठी महायुतीने निर्णय घेतले मात्र हे आरक्षण मविआ सरकारने सर्वोच्च न्यायालयात घालवलं. मराठा समाजाची दिशाभूल न करता न्यायालयात टीकणार आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, मराठी आंदोलकांवर लाठीमारचा आदेश कोणी देतं का? असा प्रतिसवाल केला. सरकारला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.
हेही वाचा :