जालन्यातील लाठीमाराच्या निषेधार्थ राज्यात आज ठिकठिकाणी बंदची हाक | पुढारी

जालन्यातील लाठीमाराच्या निषेधार्थ राज्यात आज ठिकठिकाणी बंदची हाक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : जालना येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलकांवर लाठीमाराच्या निषेधार्थ मुंबईत शनिवारी (दि. 2) आंदोलन करण्यात येणार आहे. जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे व पोलिस अधीक्षक यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार यांनी शुक्रवारी दिली.

जालना येथील मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ मुंबईत उद्या शनिवारी आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र; आंदोलनाचे अद्याप ठिकाण ठरले नसल्याचे वीरेंद्र पवार यांनी सांगितले.

पुण्यात निषेध आंदोलन

जालना येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठीमारामुळे अनेक आंदोलक जखमी झाले. या घटनेचा निषेध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा पुणेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कुंजीर यांनी दिली.

जालना येथील घटनेचा निषेध करण्यासाठी शुक्रवार सायंकाळी मराठा समाजातील विविध संघटनांनी एकत्र येत निषेध नोंदविला. सरकारच्या या नाकर्तेपणाचा निषेध करण्यासाठी मराठा समाजातील सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठा समाजातील नागरिक शनिवारी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करणार आहेत.
याप्रसंगी शिवसंग्रामचे तुषार काकडे, मराठा महासंघाचे गणेश मापारी, अनिल ताडगे, पूजा झोळे, मयूर गुजर, विराज तावरे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगरात आंदोलन

या घटनेचे तीव्र पडसाद छत्रपती संभाजीनगरातही उमटले. शहरातील क्रांतीचौक, बीडबायपाससह ठिकठिकाणी संतप्त मराठा समाज थेट रस्त्यावर उतरला. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी वाहनांचे टायर जाळून पोलिसांच्या मारहाणीचा निषेध करतानाच रास्ता रोको आंदोलनही केले. यावेळी आंदोलकांनी जय जिजाऊ जय शिवराय… एक मराठा, लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण मिळायलाच पाहिजे, यासह राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन परिसर दणाणून सोडला. तब्बल तास भर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे बीडबायपास मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, बीड, लातूरसह राज्यात विविध ठिकाणी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

हेही वाचा : 

Back to top button