जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ मुनगंटीवार यांना जिल्ह्यात फिरु देणार नाही : कावरखे | पुढारी

जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ मुनगंटीवार यांना जिल्ह्यात फिरु देणार नाही : कावरखे

गोरेगाव; पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील अबंड तालुक्यातील अंतरवरली सराटी गावात सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा आरक्षण मिळावे, यासाठी आमरण उपोषण शांततेत सुरू असताना सदरील उपोषण पोलिसांनी दडपण्याच्या कारणावरुन आंदोलकांवर पोलिसांनी निर्दयीपणे अमानुष लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक मराठा आंदोलक जखमी झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जिल्ह्यात फिरु न देण्याचा इशारा शेतकरी नेते गजानन कावरखे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला. यानंतर कावरखे यांना गोरेगाव पोलीसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले.

मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे. यासाठी राज्यभरात मुकमोर्चा आंदोलने झाली. मराठा आरक्षण देण्याच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे यांनी नदीपात्रात उडी घेऊन जीवन संपवले. मात्र सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे सकल मराठा समाजाला आरक्षण मिळाले नसल्याने आंदोलनाची धग कायम आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवरली सराटी गावात दि. २९ ऑगस्ट पासून सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे.

उपोषण शांततेत असतानाही सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांवर दबाव आणून आंदोलन चिघळू नये यासाठी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत रेटारेटी झाली. आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पोलिसांनी आंदोलकांवर हवेत गोळीबार करुन अमानुष लाठी चार्जही केला पोलिसांनी अत्यंत निर्दयीपणे लाठीचार्ज केल्यामुळे याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ शेतकरी नेते गजानन कावरखे यांनी वनमंत्री मुनगंटीवार यांना हिंगोली जिल्ह्यात फिरु न देण्याचा इशारा देताच त्यांना गोरेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : 

Back to top button