सांगली : नोकरीच्या आमिषाने पावणेदोन लाखांचा गंडा | पुढारी

सांगली : नोकरीच्या आमिषाने पावणेदोन लाखांचा गंडा

सांगली : पुढारी वृत्तसेवा

येथील राजेश हमीद चव्हाण (वय 48, रा. खणभाग, पाटणे गल्ली) यांना त्यांच्या मुलीला नोकरी लावतो, असे सांगून एक लाख 70 हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. याबाबत त्यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी कुलदीप राजेश्याम श्रीवास्तव (वय 37, रा. मिरज) या संशयिताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजेश हे महापालिकेत नोकरीला आहेत. यांच्या मुलीचा नर्सिंग कोर्स झालेला आहे. ती सिव्हिल रुग्णालयात गेल्यानंतर तिची श्रीवास्तव याच्याशी ओळख झाली. त्यावेळी त्यांनी मी तुला सिव्हिलमध्ये नोकरी लावतो, त्यासाठी एक लाख 70 हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर चव्हाण यांनी श्रीवास्तव यांची भेट घेतली.

त्यांनाही पैसे द्या तुमच्या मुलीला नोकरी मिळेल, काही अडचण येणार नाही, असे सांगितले. त्याप्रमाणे राजेश यांनी श्रीवास्तव यांच्या बँकेच्या खात्यावर एक लाख 70 हजार रुपये भरले. त्यानंतर काही दिवसात श्रीवास्तव याचा संपर्क झाला नाही. त्याचा मोबाईल ही लागला नाही. सिव्हिलमध्ये जाऊन पाहिले असता त्या ठिकाणीही तो भेटला नाही. त्यामुळे चव्हाण यांना आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. त्यानंतर सांगली शहर पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button