सांगली : नोकरीच्या आमिषाने बारा लाखांचा गंडा, दोघांना अटक

सांगली : नोकरीच्या आमिषाने बारा लाखांचा गंडा, दोघांना अटक
Published on
Updated on

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मुलाला नोकरी लावण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला 12 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी बँकेच्या दोघा सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे.

हणमंत कृष्णा भोई (रा. बोरगाव, ता. वाळवा), धनाजी अण्णा शिंदे (रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, इस्लामपूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

आनंदा शंकर घाडगे (रा. बोरगाव) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांकडून दिलेली माहिती अशी, आनंदा घाडगे यांचे बोरगावमध्ये वेल्डिंगचे दुकान आहे. जानेवारी महिन्यामध्ये हणमंत भोई यांच्या घरातील फॅब्रिकेशनचे काम सुरू होते. त्यावेळी धनाजी शिंदे तेथे आला होता. हणमंत भोई याने 'मी जिल्हा मध्यवर्ती बँकेत मोठा अधिकारी असून, सध्या बँकेत भरती सुरू आहे. कोणाला नोकरीला लावायचे असल्यास मी लावतो. त्यासाठी 12 ते 15 लाख रुपये द्यावे लागतील', असे घाडगे यांना सांगितले.

त्यानंतर घाडगे यांनी मुलगा सत्यम याला बँकेमध्ये क्लार्क म्हणून नोकरी लावण्यासाठी उसनवारीने सहा लाख रुपये जमा केले. 11 जानेवारी रोजी घाडगे यांनी ती 6 लाख रुपयांची रक्कम इस्लामपूर येथे मेहुण्याच्या घरी भोई, शिंदे यांना दिली.

त्यानंतर घाडगे यांनी 1 जून रोजी राहिलेली सहा लाख रुपये बोरगाव येथील त्यांच्या वेल्डींगच्या दुकानात भोई, शिंदे यांना दिले. त्यानंतर काही दिवस घाडगे हे मुलाच्या नोकरी मिळेल, या आशेवर गप्प होते.

काही दिवसात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नोकर भरतीची जाहिरात निघाली. बँकेतील नोकर भरती प्रक्रिया पूर्ण झाली. मुलाला नोकरी लागत नाही, असे लक्षात आल्यानंतर घाडगे यांनी शिंदे, भोई यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला. दोघांनी, 'तुझ्याकडे काय पुरावा आहे, आम्ही पैसे देत नाही, तुला काय करायचे ते कर', अशी धमकी दिली.

भोई, शिंदे यांच्यावर फसवणुकीचा दुसरा गुन्हा

काही महिन्यांपूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकरीला लावण्याच्या आमिषाने पुतणीची फसवणूक केल्या प्रकरणी हणमंत भोई आणि त्याचा साथीदार धनाजी शिंदे यांच्यावर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. बँकेमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने भोई, शिंदे यांनी कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन इस्लामपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news