

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत नवे विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज (दि.३) घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांना विरोधी पक्षनेते पदाच्या आसनावर बसवले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर विरोधी पक्ष नेतेपदावर काँग्रेसने दावा केला होता. विजय वडेट्टीवार यांचे नाव विरोधी पक्षनेते पदासाठी प्रस्तावित करावे, असे काँग्रेस हायकमांडने बाळासाहेब थोरात यांना कळवले होते. आज त्यांच्या नावाची विधानसभेत घोषणा करण्यात आली.
शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत नाही तोच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आमदारांचा एक गट घेऊन पक्षाच्या बाहेर पडत सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे विधानसभेत मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होते. काँग्रेसकडून या पदासाठी विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सुनील केदार यांच्या नावांची चर्चा होती. अखेर विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने विधानसभेत विजय वडेट्टीवार यांचे नाव एलओपी म्हणून ठेवण्यात आले. आज विधानसभा अध्यक्षांनी वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय वडेट्टीवार यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. "विजय वडेट्टीवार यांच्यावर अन्याय झाला. आम्हाला वाटलं हे अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविना जात की काय? याआधीच नाव द्यायाला पाहिजे होते. विजय वडेट्टीवार या पदाला न्याय देतील. बाळासाहेब ठाकरेंच तत्व विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसमध्ये गेल्यानंतरही जोपासलं. काहींना बाळासाहेबांचा सहवास लाभूनही विचार घेता आले नाहीत," असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
ज्यांच्यामुळे तुम्ही शिवसेना सोडली त्यांच्याशीच तुमची गाठ पडली आहे. निवडणुका जवळ आल्या की विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते पद मिळते पण निवडणुका झाल्या की त्यांना विसरलं जातं, ही वस्तूस्थिती आहे. निवडणुकीला १३-१४ महिने आहेत. या पदाचा चांगला उपयोग कराल असा विश्वास आहे. पण २०२४ साली राज्यात आमची सत्ता येणार, त्यावेळी विरोधी पक्षनेता बनवायला तुम्हाला टाळाटाळ करतील, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
विजय वडेट्टीवार यांच्या विरोधी पक्षनेते पदी निवडीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी ते म्हणाले की, २०१९ मधले खरे हिरो अजित पवार आहेत. ते पहिल्यांदा माझ्यासोबत उपमख्यमंत्री झालेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री झाले. मग विरोधी पक्षनेते आणि आता पुन्हा उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या खालोखाल मी आहे. पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली मग विरोधी पक्षनेता झालो आणि आता उपमुख्यमंत्री आहे. पण आता काही बदल नाही. आता तिघेही ज्या पदावर आहे त्याच पदावर राहणार आहे. आता जी जबाबदारी मिळाली त्यामध्ये आनंदी आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
हेही वाचा :