पुढारी ऑनलाईन : जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेचे रेटिंग कमी होत असताना भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने (Morgan Stanley) भारताचे रेटिंग 'ओव्हरवेट'मध्ये अपग्रेड केले आहे. उर्वरित जगाची अर्थव्यवस्था मंदावली असताना भारत भरीव आणि शाश्वत आर्थिक विकासासाठी सज्ज आहे, असे मॉर्गन स्टॅनलीचे म्हणणे आहे. यासोबतच त्यांनी चीनचे रेटिंग घटवून 'इक्वल-वेट' केले आहे.
मॉर्गन स्टॅनलीने ३१ मार्च रोजी कमी मूल्यमापन प्रीमियम आणि लवचिक अर्थव्यवस्थेचा हवाला देत भारताला अंडरवेट वरून इक्वलवेटच्या श्रेणीत अपग्रेड केले होते आणि आता चार महिन्यांनंतर भारताला त्यांनी 'ओव्हरवेट'वर श्रेणीत ठेवले आहे. याचाच अर्थ ४ महिन्यांत भारतीय अर्थव्यवस्थेने घेतलेली ही दुसरी उसळी आहे. भारताने सहाव्या स्थानावरून झेप घेत आपल्या क्रमवारीत पहिले स्थान मिळवले असल्याचे मॉर्गनने म्हटले आहे.
भारताचा सुधारणा केंद्रित आणि मॅक्रो-स्थिर अजेंडा मजबूत भांडवली खर्च (capex) आणि नफ्याचा दृष्टीकोनाची शक्यता मजबूत करतो, असे ब्रोकरेज फर्म मॉर्गनने त्यांच्या अहवालात म्हटले आहे.
शिवाय मॉर्गनने (Brokerage firm Morgan Stanley) भारताच्या औद्योगिक, वित्तीय आणि ग्राहक स्वेच्छाधीन स्टॉक्ससह विशिष्ट क्षेत्रात श्रेणीत सुधारणा केली आहे. या क्षेत्राचे रेटिंग आता 'ओव्हरवेट' म्हणून केले गेले आहे. ही क्षेत्रे भारताच्या सध्याच्या संरचनात्मक वाढीच्या गोष्टीचे प्रमुख योगदानकर्ते असतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
त्याच्या आशिया-पॅसिफिक फोकस यादीत मॉर्गन स्टॅलनीने लार्सन अँड टुब्रो आणि मारुती सुझुकी सारख्या भारतीय शेअर्सचा समावेश केला आहे. तर टायटनला या यादीतून काढून टाकण्यात आले आहे. लार्सन अँड टुब्रो आणि मारुती सुझुकी या दोन्हींचाही जेईएम (ग्लोबल इमर्जिंग मार्केट्स) फोकस यादीत समावेश करण्यात आला आहे.
आशिया पॅसिफिक एक्स-जपान आणि इमर्जिंग मार्केट श्रेणीमध्ये मॉर्गन स्टॅनलीने भारताला कोर ओव्हरवेट स्थान दिले आहे. उद्योन्मुख बाजारपेठ आणि चीनच्या तुलनेत भारतासाठी मूल्यमापन प्रीमियम्स मागील वर्षात कमी झाले होते, पण ते पुन्हा वाढू लागले आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात भारतात गुंतवणूक वाढत आहे.
हे ही वाचा :