

पुढारी ऑनलाईन डेस्क : महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे महानायक आहेत, त्यांच्या अपमान कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन केला जाणार नाही', असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.३० ) माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले. दरम्यान, संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यभर पडसाद उमटत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी भिडे गुरुजींच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात येत आहेत. ( Fandanvis on Sambhaji Bhide)
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे महानायक आहेत, त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे.' भिडे गुरुजी आणि इतर कोणीही अशाप्रकारचे वक्तव्य करु नये. महात्मा गांधी असाेत की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य सहन होणार नाहीत. या संदर्भात उचित कारवाई करण्यात येईल." (Fandanvis on Sambhaji Bhide)
संभाजी भिडे यांचा भाजपशी काहीही संबंध नाही, असे स्पष्ट करत या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आराेप त्यांनी केला. जसं काँग्रेस आता रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत त्याचप्रमाणे जेव्हा राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं तेव्हा त्यांनी आंदोलन करायला हवं होतं, असेही फडणवीस म्हणाले. महात्मा गांधी असो किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर कोणाहीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य सहन केलं जाणार नाही मग ते असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा;