Parliament Monsoon Session first day : मणिपूर प्रकरणावरुन संसदेत प्रचंड गदारोळ, उभय सदनांचे कामकाज बाधित | पुढारी

Parliament Monsoon Session first day : मणिपूर प्रकरणावरुन संसदेत प्रचंड गदारोळ, उभय सदनांचे कामकाज बाधित

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मणिपूरमधील कुमी-झोमी समाजाच्या दोन महिलांना निर्वस्त्र करुन त्यांची धिंड काढल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उभय सदनात उमटले. संसदेत सर्वप्रथम या विषयावर चर्चा घेण्यात यावी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर निवेदन करावे, असा आग्रह विरोधी पक्षांनी धरला. प्रचंड गदारोळामुळे दोन्ही सदनांचे कामकाज वाया गेले. (Parliament Monsoon Session first day)

विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेत कामकाज आधी दुपारी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. तर दुसरीकडे राज्यसभेत दोन वेळच्या तहकुबीनंतर कामकाज दिवसभरासाठी गुंडाळावे लागले. मणिपूरच्या मुद्यावर चर्चा घेण्यास सरकार तयार असल्याचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी राज्यसभेत सांगितले. सभापती जगदीप धनखड यांनीही या विषयावर अल्पकालीन चर्चेची परवानगी दिली जाऊ शकते, असे सांगितले. मात्र त्यावर विरोधकांचे समाधान झाले नाही.

संसद चालू देण्याची विरोधकांची मानसिकता नसल्याचा आरोप यावर गोयल यांनी केला. इतर सर्व कामकाज बाजूला ठेवून आधी या विषयावर चर्चा घेण्याचा आग्रह काँग्रेसचे मल्लिकार्जुन [खर्गे यांनी केला. तृणमूलचे खासदारही या मुद्द्यावरुन आक्रमक झाले होते.

पंतप्रधान मोदी यांनी केली सोनिया गांधी यांच्या प्रकृतीची विचारपूस

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काॅंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. गांधी यांनी आपण उत्तम असल्याचे मोदी यांना सांगितले. बंगळुरुमध्ये झालेल्या विरोधी आघाडीच्या बैठकीनंतर दिल्लीला परतत असताना सोनिया गांधी यांना घेणारे विमान खराब हवामानामुळे भोपाळमध्ये उतरविण्यात आले होते. त्यावेळी सोनिया गांधी यांनी आॅकि्सजन मास्क घातल्याचे छायाचित्र व्हायरल झाले होते. यामुळे त्यांच्या तब्येतीबाबत शंका उपसि्थत करण्यात आल्या होत्या. दरम्यान सोनिया गांधी यांनी मणिपूरच्या घटनेवर संसदेत चर्चा घेतली जावी, अशी मागणी पंतप्रधानांकडे केली आहे.
ठळक वैशिष्ट्ये
  • मणिपूरच्या घटनेवर उभय सदनात चर्चा घेण्यास सरकार तयार असल्याचे संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत सांगितले.
  •  अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी विरोधी पक्षांनी बैठक घेत कोणकोणते मुद्दे उपसि्थत करायचे, यावर खलबते केली.
  •  बंगालमधील हिंसाचाराच्या मुद्यावर भाजप खासदारांची संसदेच्या प्रांगणात घोषणाबाजी
  • मणिपूरमधील ती घटना वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते शशी थरुर, मणिकम टागोर, भाजपच्या रीता बहुगुणा जोशी, रंजन गोगोई, अपक्ष नवनीत राणा, एमआयएमचे असउद्दीन ओवेसी आदी खासदारांनी दिली.
  • राज्यसभेत गदारोळातच मंत्री अनुराग ठाकूर यांनी सिनेमॅटोग्राफिक सुधारणा विधेयक सादर केले
  • लोकसभेत सकाळी अकरा वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर दिवंगत खासदार बाळू धानोरकर, रतनलाल कटारिया यांच्यासह माजी दिवंगत खासदारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
  • लोकसभेत आम आदमी पक्षाचे नेते सुशीलकुमार रिंकू यांनी खासदारकीची शपथ घेतली

हेही वाचा

Back to top button