फेसबुकवर आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

फेसबुकवर आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : फेसबुकवर आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात मुलुंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मुलुंड पश्चिमेकडील जे. एन. रोड परिसरात राहत असलेले ४५ वर्षीय तक्रारदार हॉटेल व्यावसायिक हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत. १७ जुलैच्या सकाळी ते भाजपाच्या मुलुंड तालुका विभाग कार्यालयात असताना फेसबुकवर त्यांच्या फ्रेंड लिस्टमध्ये असलेल्या मुलुंडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याने त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर एक व्हिडिओ पोस्ट केलेला दिसला.

एका मराठी न्यूज चॅनलला एक बाईट दिलेला तो व्हिडीओ होता. त्या व्हिडिओला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने एक मथळा होता. व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे त्यांना दिसले. अखेर या भाजपा पदाधिकाऱ्याने मुलुंड पोलीस ठाणे गाठत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याविरोधात भावना दुखविल्या आणि वरिष्ठ संविधानिक पदावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल द्वेष भावना निर्माण होऊन त्यांची व भाजपाची जनमानसात असलेली प्रतिमा मलिन करणारा व्हिडिओ प्रसारित केल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करुन मुलुंड पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button