

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार गट वेगळा झाला. नऊ मत्र्यांनी शपथही घेतली. यानंतर गेली दाेन दिवस अजित पवार गटाचे नेते आणि आमदारांनी शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र शरद पवार आपल्या मतावर ठाम राहिले. आज ते (दि.१८) बंगळूर येथे विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीत उपस्थित राहीले. यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेत्यांबरोबरचे फोटो शेअर करत सूचक ट्विट केले आहे. (Sharad Pawar Tweet) या सूचक ट्विटची साेशल मीडियावर चर्चा हाेत आहे.
विरोधी पक्ष नेत्यांबरोबरचे फोटो शेअर करत शरद पवार यांनी म्हटलं आहे की, "आज बंगळूर येथे विरोध पक्षांच्या बैठकीसाठी उपस्थित राहिलो. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीपीआय नेते सीताराम येचुरी, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे नेते खा. डेरेक ओ ब्रायन आणि विविध विरोधी पक्षांच्या मान्यवरांसोबत भेटीगाठी झाल्या. यावेळी उपस्थित सर्व नेत्यांकडून एकत्र लढू आणि जिंकू असा निर्धार करण्यात आला."
शरद पवार यांनी केलेल्या ट्विटमुळे त्यांची भूमिका स्पष्ट झाली आहे. आपण विराेधी पक्षांबराेबरच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
खासदार आणि शरद पवार यांच्या मुलगी सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट करत शरद पवार आपल्या राजकीय कारकिर्दितील पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतानाचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की," आदरणीय पवार साहेबांनी ४५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी ते केवळ ३७ वर्षांचे होते. महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांची नोंद राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री अशी झाली आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा झंझावात तेव्हा जसा होता तसाच किंवा त्याहीपेक्षा जास्त आता देखील आहे.
हेही वाचा