पाठ्यपुस्तकांचा अनुवाद आवश्यक ! मातृभाषेतून शिक्षणाबाबत ‘यूजीसी’कडून मार्गदर्शक सूचना जारी | पुढारी

पाठ्यपुस्तकांचा अनुवाद आवश्यक ! मातृभाषेतून शिक्षणाबाबत ‘यूजीसी’कडून मार्गदर्शक सूचना जारी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020नुसार उच्च शिक्षणातील अभ्यासक्रमही मातृभाषेतून उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी पाठ्यपुस्तके भारतीय भाषांमध्ये अनुवादित होण्याची गरज व्यक्त करून विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यूजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार उच्च शिक्षण संस्थांनी अभ्यासक्रम रचना, अभ्यासक्रम, अभ्यास साहित्य भारतीय भाषांमध्ये तयार करणे आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना मातृभाषेत किंवा स्थानिक भाषेत परीक्षा देणे शक्य होईल. त्यामुळे स्थानिक भाषेत किंवा मातृभाषेत अध्ययन अध्यापन करण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठांनी नव्याने अभ्यासक्रमांची निर्मिती करतानाच मोठ्या प्रमाणात भारतीय भाषांमध्ये अनुवाद करणेही आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

मूळ अर्थ कायम ठेवून विद्यार्थ्यांना कळेल इतक्या सोप्या भाषेत संकल्पनांची मांडणी आणि अनुवाद करणे आवश्यक आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अनुवादासाठी अनुवादिनी ही प्रणाली विकसित केली आहे. त्याचा वापर पाठ्यपुस्तकांच्या अनुवादासाठी करता येऊ शकतो. त्यात स्पीच टू टेक्स्टसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात या प्रणालीचा वापर करून अनुवाद केल्यावर पुढील टप्प्यात अधिक प्रभावी पद्धतीने संपादन करता येऊ शकते. कमिशन फॉर सायंटिफिक अँड टेक्निकल टर्मिनॉलॉजी यांच्याकडून विविध क्षेत्रांसाठी प्रमाणित शब्दकोश तयार करण्यात आले आहेत.

अनुवाद प्रक्रियेत त्याचा वापर करता येऊ शकतो. तांत्रिक संज्ञा विद्यार्थ्यांना नेमक्या पद्धतीने कळण्यासाठी अनुवादासह इंग्रजी संज्ञा किंवा इंग्रजी संज्ञा प्रादेशिक लिपीत देता येऊ शकतात. राज्य सरकारांचे ग्रंथ विभाग, विद्यापीठांतील भाषा विभागांनी प्रसिद्ध केलेल्या शब्दकोशांचा वापर करता येईल, असे नमूद करण्यात आले आहे.

Back to top button