गुजरात दंगलीत मोदींची बाजू मांडणाऱ्या वकिलांमुळे आर्यन खानची 'दिवाळी' जोरात ! - पुढारी

गुजरात दंगलीत मोदींची बाजू मांडणाऱ्या वकिलांमुळे आर्यन खानची 'दिवाळी' जोरात !

पुढारी ऑनलाईन डेस्क

क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात तब्बल २५ दिवसांत जेलमध्ये असलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला आज मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. त्यामुळे आर्यन खानची ‘दिवाळी’ जोरात होणार आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. अखेर आज (ता.२८) न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. आर्यनसाठी ॲड. सतीश मानेशिंदे, अमित देसाई आणि मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या बाजून मुकुल रोहतगी यांनी जोरदार युक्तीवाद करत एनसीबीच्या दाव्यातील हवा काढून घेतली होती.

अखेर ड्रग्‍ज प्रकरणी उच्‍च न्‍यायालयाने आज आर्यन खानला जामीन मंजूर केला. त्‍याचबरोबर अरबाज मर्जंट आणि मूनमून धमेचा यांनाही जामीन मंजूर करण्‍यात आले. मागील तीन दिवस आर्यन खानसह अन्‍य आरोपींच्‍या जामीन अर्जावर मुंबई उच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली. दरम्‍यान, निकालाची प्रत उद्या मिळणार असल्‍याने आर्यन खान शुक्रवारी आर्थर रोड कारागृहातून बाहेर येण्‍याची शक्यता आहे.

कोण आहेत मुकुल रोहतगी?

६६ वर्षीय मुकुल रोहतगी हे भारतातील सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ अधिवक्ता आहेत. ते भारताचे १४ वे महाधिवक्ता राहिले आहेत. त्यांच्यानंतर के.के. वेणुगोपाल यांनी त्यांची जागा घेतली. मुकुल रोहतगी यांनी भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून काम पाहिले आहे.

मुकुल रोहतगी यांनी यापूर्वी अनेक प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या खटल्यांचे वकील म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. २००२ च्या गुजरात दंगली प्रकरणात त्यांनी गुजरात सरकारची सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली होती. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाशी संबंधित प्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हा एक ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगितले होते.

२००२ च्या गुजरात दंगलीप्रकरणी मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात गुजरात सरकारची बाजू मांडली होती. याशिवाय बनावट चकमक प्रकरणातही त्यांनी राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद केला. याशिवाय बेस्ट बेकरी खटला, जाहिरा शेख खटला, योगेश गौडा खून प्रकरणातही त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढा दिला आहे.

विशेष सीबीआय न्यायाधीश बीएच लोया यांच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या हाय-प्रोफाइल प्रकरणात महाराष्ट्र सरकारने त्यांची स्पेशल प्रॉसिक्युटर म्हणून नियुक्ती केली होती. त्याचवेळी या प्रकरणाच्या तपासासाठी त्यांना १.२० कोटी रुपये शुल्कही देण्यात आले होते.

ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानचे समर्थन केले होते. सत्र न्यायालयाने जामीन फेटाळण्यापूर्वी मुकुल रोहतगी म्हणाले होते की, आर्यनला तुरुंगात ठेवण्याचे कोणतेही न्याय्य कारण नाही. एनसीबीवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) वाळूमध्ये डोके लपवून बसलेल्या ‘शहामृगा’सारखे आहे. सेलिब्रेटीचा मुलगा असल्याची किंमत आर्यन चुकवत आहे.

हे ही वाचलं का? 

Back to top button