Sameer Wankhede मुस्लिम की हिंदू! वडिलांनी केला खुलासा | पुढारी

Sameer Wankhede मुस्लिम की हिंदू! वडिलांनी केला खुलासा

मुंबई; पुढारी ऑनलाईन

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद वाढत चाललाय. नवाब मलिक यांच्याकडून वानखेडे यांच्या विरोधात गंभीर आरोपांची मालिका सुरुच आहे. याच दरम्यान नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा निकाह नामाच ट्विट केला. वानखेडे यांनी डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी निकाह केला होता. या निकाह नाम्यात समीर दाऊद वानखेडे या नावाचा उल्लेख दिसतो. ७ डिसेंबर २००८ रोजी समीर दाऊद वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा निकाह अंधेरी पश्चिमधील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये झाला होता, अशी माहिती नवाब मलिक यांनी ट्विटद्वारे दिली. यावर आता समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी खुलासा केला आहे.

नवाब मलिक यांनी वैयक्तिक जीवनात जाऊ नये. समीर आणि पहिल्या पत्नीतील घटस्फोट कायदेशीर होता, असा दावा ज्ञानदेव वानखेडे यांनी केला आहे. शासकीय कागदपत्रांमध्ये माझ्या नावाचा उल्लेख ज्ञानदेव वानखेडे असा आहे, असेही ते म्हणाले. नवाब मलिक यांच्याविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

निकाहवेळी समीर आणि शबाना दोघे मुस्लिम होते

मी मागासवर्गीय आहे. माझी जी जात आहे तीच माझ्या मुलाची जात असेल. माझी पत्नी लाडानं मला दाऊद म्हणून हाक मारायची. समीर यांनी जातीसंर्दभात जी कागदपत्रे दाखवली आहेत ती खरी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, ज्यावेळी निकाह झाला त्यावेळी समीर आणि शबाना दोघे मुस्लिम होते, असा दावा काझी मुजाम्मिल अहमद यांनी केला आहे. वानखेडे कुटुंबीय मुस्लिम आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. मी हिंदू आहे हिंदूच राहीन. पण मी मुस्लिम पद्धतीने लग्न केले होते, असा खुलासा समीर (Sameer Wankhede) यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे. मुस्लिम मुलीशी लग्न केल्याने मी मुस्लीम होतो का? असा सवालदेखील त्यांनी केला आहे.

समीर वानखेडे प्रकरणात मुंबई पोलिसांची एन्ट्री

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणारे अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आहेत. त्यांच्याविरोधातील आरोपांची आता मुंबई पोलिस चौकशी करणार आहेत. त्यासाठी मुंबई पोलिसांनी सहाय्यक पोलिस आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. मुंबईतील चार पोलिस स्थानकात वानखेडे यांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा :
पहा व्हिडिओ : कोल्हापूर : पट्टणकोडोली येथील भाकणूक | Pattankodoli yatra 2021 Special

Back to top button