व्हॉट्सअॅप चॅटच्या (WhatsApp) चक्रव्यूहात बॉलिवूड सेलिब्रिटीज पुन्हा एकदा अडकल्या आहेत. आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यातील चॅटिंग धुंडाळून काढण्यात यशस्वी ठरल्याने एनसीबीला अनेक नव्या गोष्टी कळल्या आहेत. बॉलीवूडमधील सूत्रांच्या माहितीनुसार असल्या चॅटिंगमुळे गोत्यात येण्याच्या शक्यतेमुळे नट-नट्या धास्तावल्या असून या सार्यांचा कल आता चॅटिंगसह फोनचा संपूर्ण डेटा कायमस्वरूपी डिलीट करण्याकडे आहे. याआधी सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतरही ड्रग्जशी संबंधित व्हॉट्सअॅप चॅटिंगमुळे अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या होत्या. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा ज्या पॉर्न फिल्म प्रकरणात अडकला आहे, त्यातही अनेक बाबी व्हॉट्सअॅप चॅटमुळे उघडकीला आल्या होत्या. या एकूणच प्रकारांमुळे व्हॉट्सअॅपवरील चॅटिंग 'एंड-टू-एंड इन्क्रिप्टेड' असते किंवा कसे, असे अनेक प्रश्न आता उभे ठाकले आहेत.
व्हॉट्सअॅप एकीकडे गोपनीयतेचा दावा करते. म्हणजे दोन जणांमधील संभाषण तिसर्याला कळूच शकत नाही, असा दावा करते; तर दुसरीकडे व्हॉट्सअॅपनेच जवळपास एक हजार कंटेंट रिव्ह्युअर कामावर ठेवले आहेत. ते व्हॉट्सअॅपवरील मजकूर न्याहाळत असतात. म्हणजेच तुम्ही जे काही व्हॉट्सअॅपवर बोलता ते केवळ दोन जणांतली बाब राहते, याची शाश्वती नाही. बॉलिवूडमधील मागील काही प्रकरणे बघितली तर या समाजमाध्यमावर फार पूर्वी झालेले तुमचे बोलणेही बाहेर काढले जाऊ शकते, ही बाब सिद्ध झाली आहे. तुमचे चॅटिंग 'एंड-टू-एंड इन्क्रिप्टेड' असले तरी ते बॅकअप स्वरूपात तुमच्या फोनवर, क्लाऊड स्टोअरेजवर सेव्ह होत असते.
आपण अकाऊंट उघडतो तेव्हाच आपल्याला डेटा अॅक्सेस करण्याची परवानगी व्हॉट्सअॅपकडून मागितली जाते. यात तुमचे लोकेशन, कॅमेरा, कॉन्टॅक्ट, फोटो, व्हिडीओ असे सर्वच घटक गृहीत असतात. तुम्ही परवानगी दिली नाही तर व्हॉट्सअॅप काम करणार नाही. या अॅपमध्ये काही डिफॉल्ट सेटिंग तुमच्या डेटाचा डेली बॅकअप घेत असतात. त्यामुळे तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅट डिलीट करायच्या असतील तर सर्व प्लॅटफॉर्म्सवरून त्या काढाव्या लागतील.
व्हॉटस् अॅपवरील चॅट चुकीच्या हातात पडू नये म्हणून ऑटोमेटिक क्लाऊड ऑप्शन डिसेबल करा. यानंतर जर तुम्ही व्हॉटस् अॅप अनइन्स्टॉल केले, तर पुन्हा अॅप इन्स्टॉल केल्यानंतर जुन्या चॅटिंग तुम्हाला उपलब्ध होणार नाहीत. डिसेबल करण्यासाठी Whats-pp Settings Chats Chat Backup Back up to Google Drive option select Never स्टेप्स फॉलो करा.
फोनवर गुगल ड्राईव्ह ओपन करा. इथे मेन्यूत बॅकअपमध्ये जा. बॅकअप इथून डिलीट करा. नंतर ट्रॅशमधूनही डिलीट करा. शिवाय फोनच्या इंटरनल स्टोअरेजमधूनही बॅकअप फाईल हटविणे गरजेचे आहे. त्यासाठी 'माय फाईल'वर जा. नंतर इंटर्नल स्टोअरेजमध्ये व्हॉट्सअॅप फोल्डरमध्ये जाऊन बॅकअपमधील सर्व फाईल डिलीट करा… ट्रॅशमधूनही काढा. फोन तसेच क्लाऊड स्टोअरेजमधून डेटा डिलीट केल्यानंतरही तो इमेज म्हणून सेव्ह असतो आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने पुन्हा मिळवता येतो. आपण ज्याला मेसेज पाठवला, त्याने तो वाचल्यानंतर जरी आपण आपल्या मोबाईलमधून तो डिलीट केला तरी तो मेसेज इमेज म्हणून सेव्ह राहतो. अकाऊंटच बंद केले, तरी कंपनी 45 दिवसांपर्यंत अकाऊंटशी संबंधित डेटा सांभाळून ठेवते.
1) डेटा हा इंटर्नल स्टोअरेज वा क्लाऊडवर स्टोअर होतो. इंटर्नल स्टोअरेजवरून जेव्हा तुम्ही डेटा डिलीट करता तेव्हा तो बिनमध्ये जातो. पुढे महिनाभरात तुम्ही हा डेटा परत मिळवू शकता.
2) डिलीट डेटा तोवर ओव्हर राईट होत नाही जोवर नवा डेटा येत नाही. म्हणजेच डेटा डिलीट केल्यानंतर तो कायमस्वरूपी काढायचा असेल तर सातत्याने अनावश्यक डेटा तुम्हाला डिलीट करत राहावे लागेल.
3) मेल वा क्लाऊड स्टोअरवर नसलेला फोनमधील डेटा फॅक्टरी रिसेट करून काढला जाऊ शकतो. फॅक्टरी रिसेट करणे म्हणजे फोन कारखान्यातून बाहेर पडला तेव्हा ज्या स्थितीत होता, त्या स्थितीत त्याला पूर्ववत आणणे.