भिवंडी : भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत बालकाचा मृत्यू | पुढारी

भिवंडी : भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत बालकाचा मृत्यू

भिवंडी; पुढारी वृत्तसेवा : शहर परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत असून वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडत आहेत. असे असतानाच शहरातील दर्गारोड दिवान शहा रस्त्यावरील कोतवाल चाळ येथे कारखान्याची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका 10 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. तर एक मुलगा जखमी झाला आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. हुसेन इरफान अन्सारी असे मयत मुलाचे नाव आहे. तो दर्गा रोड दिवानशाह येथील कोतवाल चाळ येथे मित्रासोबत सायंकाळी खेळत असताना अचानक लगत असलेली कारखान्याची जीर्ण झालेली भिंत कोसळल्याने दोन्ही मुले मातीच्या ढिगाऱ्या खाली दबले गेले. ही घटना नागरिकांना समजताच त्यांनी मदत कार्य सुरू केले. यावेळी पालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन मुलांना जखमी अवस्थेत बाहेर काढले. त्यांना स्व. इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात उपचार करता दाखल केले. मात्र, यावेळी हुसेन या मुलाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर, दुसरा मुलगा जखमी असून त्याची प्रकृती स्थिर आहे याबाबत भोईवाडा पोलिसांनी नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा;

Back to top button