लंडन; उदय बिनीवाले : अजूनही स्वप्नाळू, युवा नोवाक जोकोवीच विम्बल्डन खेळतोय असेच वाटते! हे नम्र उद्गार आहेत विक्रमवीर सर्वश्रेष्ठ महान टेनिस सम्राट जोकोवीच याचे. 136 व्या विम्बल्डन स्पर्धेपूर्वी जगातील अनेक दिग्गज खेळाडूंनी क्रीडा समीक्षकांशी संवाद साधला. (Wimbledon)
24 व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या उंबरठ्यावर असलेल्या नोवाक जोकोवीचने दिलखुलासपणे वार्तालाप केला. नोवाक म्हणाला, 'इथे अनेकवेळा जिंकलो. विम्बल्डन खेळण्याचा विशेष आनंद तर होतोच, पण अभिमानही वाटतो. अजूनही इथे येताना मला एक तरुण, युवा टेनिस खेळाडू ज्याचे स्वप्न विम्बल्डन खेळण्याचे असते, असेच भासत असते. 23 ग्रँड स्लॅम जिंकूनही मला थकल्यासारखे वाटत नाही. अजून मला किताब जिंकायचे आहेत. विजेतेपदाची भूक कायम आहे. जोपर्यंत ही सळसळ कायम आहे तोपर्यंत उच्च स्पर्धेमध्ये खेळत राहीन.' (Wimbledon)
युवा, तडफदार स्पॅनिश खेळाडू कार्लोस अल्कारेझबाबत त्याने गौरवोद्गार काढले. नोवाक म्हणाला, 'विसाव्या वर्षीच त्याने घवघवीत यश मिळवून ऐतिहासिक कामागिरी केली आहे. तो जबरदस्त शक्ती, उत्साह आणि त्वेशाने खेळतो. एक सभ्य खेळाडू असून मैदानाबाहेर देखील त्याची वागणूक आदर्श असते. कार्लोसचे भवितव्य उज्ज्वल असेल.'
द्वितीय मानांकित महिला खेळाडू एरिना सबालेंका म्हणाली, 'येथे खेळण्यासाठी मी आतूर असून काहीशी भावूक झाली आहे. कोणतीही आशा किंवा विशेष ध्येय ठेवले नसून स्वतःचा सर्वोत्कृष्ट खेळ करणे हेच उद्दिष्ट आहे. मध्यंतरी थोडी सुट्टी घेऊन आता मोठ्या स्पर्धांसाठी सज्ज आहे.' बेलारुसच्या सबालेंकाने कोणत्याही राजकीय विषय आणि घडामोडींबाबत मत किंवा भाष्य व्यक्त करणार नाही असे स्पष्ट केले.
हेही वाचा;