ICC ODI  WC 2023 : वेस्ट इंडिज क्रिकेट डाईड अ‍ॅट झिम्बाब्वे | पुढारी

ICC ODI  WC 2023 : वेस्ट इंडिज क्रिकेट डाईड अ‍ॅट झिम्बाब्वे

शनिवारी लॉर्डस्च्या रंगतदार अवस्थेतल्या ऍशेस कसोटी सामन्याचा आनंद घेताना वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार सर क्लाईव्ह लॉइड दिसले. इंग्लड-ऑस्ट्रेलियाचा सामना लॉइड बघत होते; पण त्याचवेळी काही हजार किलोमीटरवर अंतरावर हरारेत वेस्ट इंडिजच्या स्कॉटलंडशी चाललेल्या लढतीकडे त्यांचे लक्ष असेल. एकीकडे याच लॉर्डस्वर दोनदा विश्वचषक उंचावल्याच्या गोड आठवणी लॉइड आठवत असतील; पण त्याच वेळेला तिकडे हरारेत स्कॉटलंडशी पराभूत होऊन वेस्ट इंडिज विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच पात्र न ठरण्याच्या नामुष्कीचा कडू घासही त्यांना पचवावा लागला. हरारेत झालेले वेस्ट इंडिजचे हरा-रे नुसता क्रिकेटच्या मैदानावरचे नव्हते तर ती हार होती ती वेस्ट इंडिज क्रिकेटच्या अस्मितेची. कित्येक दशके क्रिकेटच्या मैदानावर निव्वळ दादागिरी करणार्‍या क्रिकेटची ही वाताहत बघून वरती वेस्ट इंडिजचे फेमस 3 डब्ल्यू (वॉरेल, विक्स, वॉलकॉट) ते या भूतलावरचे सोबर्स, लॉइड, रिचर्डस् पर्यंत सर्व अश्रू ढाळत असतील; पण वेस्ट इंडिज क्रिकेटची ही वाताहत का व्हावी? दोन वेळा पन्नास षटकांचा आणि दोन वेळा ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक जिंकणारे वेस्ट इंडिज यंदाच्या विश्वचषकाला साधे पात्रही ठरू शकत नाहीत? (ICC ODI  WC 2023)

झिम्बाब्वे पात्रता फेरीतील पराभव ही या वेस्ट इंडिज क्रिकेटच्या अधःपतनाची सुरुवात नसून, गेली काही वर्षे अव्याहत सुरू असलेल्या अधःपतनाच्या प्रक्रियेची अखेर होती. आयसीसी स्पर्धेसाठी पात्र न ठरण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी ते पात्र ठरले नव्हते; तर 2022 च्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकासाठीही त्यांना पात्रता फेरीतून मुख्य ड्रॉ मध्ये यावे लागले होते. वेस्ट इंडिजचे क्रिकेट अडखळत होतेच; पण कसेबसे मुख्य स्पर्धेत पोहोचत होते. पण, यंदा त्यांनी नेपाळ आणि अमेरिका या दुबळ्या संघांविरुद्ध विजय मिळवला; पण नेदरलँड, झिम्बाब्वे आणि स्कॉटलंडसारख्या एकेकाळी विश्वचषकात खेळलेल्या संघांविरुद्ध त्यांनी सपशेल शरणागती पत्करली. त्यात नेदरलँड आणि स्कॉटलंडविरुद्धचा पराभव हा वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी आघात होता. (ICC ODI  WC 2023)

वेस्ट इंडिज क्रिकेटच्या पडझडीला सर्वात मुख्य कारण म्हणजे अर्थकारण. क्रिकेटपटूंचे खेळायचे आयुष्य असते ते जेमतेम पस्तीस ते अडतीस वषार्ंपर्यंतचे. ज्या वयात बाकीचे आपले करिअर उंचावत असतात तेव्हा क्रिकेटपटूला निवृत्त व्हावे लागते. पस्तिशीत निवृत्ती घेतल्यावर उरलेले आयुष्य एका ठराविक लाईफस्टाईलमध्ये घालवायला पैशाची तजवीज असणे नितांत गरजेचे असते. वेस्ट इंडिज क्रिकेटचा जो सुवर्णकाळ होता, तेव्हा क्रिकेट हे पैशासाठी न खेळता देशासाठी खेळण्यात धन्यता मानण्याचा होता. वेस्ट इंडिजच काय, सर्वच देशातील क्रिकेटपटूंच्या आर्थिक स्थितीला क्रिकेटचा विशेष हातभार नव्हता. आजच्या गडगंज बीसीसीआयकडे 1983 च्या आपल्या विजेत्या संघाला बक्षीस द्यायला पैसे नव्हते; पण आता काळ बदलला आहे. वेस्ट इंडिजमध्ये गुणवत्ता संपली असे म्हणणे चुकीचे ठरेल. तेव्हा वेस्ट इंडिज क्रिकेटच्या अधोगतीची मुख्य कारणे मांडायची झाली, तर ती अशी-

वेस्ट इंडिज बोर्ड आणि खेळाडू यांचे संबंध : जगाच्या पाठीवर वेस्ट इंडिज नावाचा देश नाही. तर वेस्ट इंडिज बोर्ड हे पाच वेगवेगळ्या देशांचे मिळून बनलेले आहे. तिजोरीत खडखडाट असलेल्या या बोर्डाकडे आज मैदाने, सराव सुविधा यासाठीही पुरेसा निधी नाही. खेळाडूंच्या कराराचा घोळ अखंड चालू आहे. पैशाच्या कारणावरून 2014 साली भारताचा एक दिवसीय सामन्याचा दौरा त्यांनी अर्धवट सोडला. 2016 च्या त्यांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक विजयानंतरही खेळाडूंना त्यांचे पैसे मिळाले नाहीत. बोर्डातील राजकारण आणि भ्रष्टाचार बोकाळला आहे आणि त्याला बळी पडत आहेत ते खेळाडू (ICC ODI  WC 2023)

उत्तम खेळाडूंना जपण्यात अपयश : दोन वेळेचा विश्वचषक विजेता कर्णधार सर क्लाईव्ह लॉइड यांनी उद्विग्न होऊन 2012 मध्ये बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना कारण दिले ते पुन्हा पैशाचे. योग्य मोबदला उत्तम खेळाडूंना न देऊ शकल्याने गेले, पोलार्ड, सॅमी, रसेल किंवा सुनील नारायण सारखे महत्त्वाचे खेळाडू देशाला खेळायला प्राधान्य न देता फ्रँचायझी क्रिकेटला प्राधान्य देऊ लागले. त्याचबरोबर वेस्ट इंडिज मधले उत्तम खेळाडू पळवायला शेजारचा अमेरिका टपून बसलेला आहे. उत्तम हाडापेराचे कॅरिबियन खेळाडू हे अमेरिकन फुटबॉल, बास्केटबॉल आणि ट्रॅक अँड फिल्ड यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. कुठेतरी आर्थिक आसरा शोधणार्‍या या खेळाडूंना स्वस्तात घ्यायला अमेरिका तयार आहेच.

संघ निवडीचे निकष : आज वेस्ट इंडिजला खेळाडू बांधून ठेवण्यात अपयश आले आहे. जे आहेत ते घेऊन त्यांना स्पर्धा खेळावी लागते. जे प्रमुख खेळाडू असतात, त्यांची मर्जी असली तर ते देशासाठी खेळतात. 2022 च्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकासाठी संघ निवडताना आंद्रे रसेल आणि सुनील नारायण यांच्या निवडीबाबत असाच घोळ झाला. रसेलला खेळायची इच्छा होती पण निवड समितीप्रमुख हेन्सलातो नको होता; तर नारायणची देशासाठी खेळायची इच्छाच नव्हती. संघ हा नेहमी अनुभवी आणि नवोदित यांचे मिश्रण असलेला असला की नवे खेळाडू संघाची धुरा वाहायला आपोआप तयार होतात. आताच्या संघातही जयडेन सील्स, अलेक अथानेझ सारखे गुणी खेळाडू आहेत. आयपीएलमध्ये 16 कोटींना विकत घेतलेला निकोलस पुरन आहे, अलझारी जोसेफ आहे किंवा कर्णधार शाय होप आहे; पण हे सर्व खेळाडू काही काळासाठी एकत्र आल्याने सांघिक परिणाम साधता येत नाही.

वैयक्तिक कामगिरीवर भर : आज जगातल्या विविध लीगमध्ये खेळायला वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना अजूनही उत्तम मागणी आहे. हे सर्व खेळाडू वैयक्तिक पातळीवर त्या त्या फ्रँचायझीशी खेळताना कामगिरी करतात, याचे मुख्य कारण हे पुन्हा पैसाच आहे. जेव्हा ते देशासाठी उपलब्धता दाखवतात तेव्हा ते त्यांचा परिणाम दाखवत नाहीत. वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी हा घोर निराशेचा दिवस आहे. या निराशेच्या गर्तेतून बाहेर यायला वेस्ट इंडिजला पुनः श्रीगणेशा करायला लागेल. एक आहे ते म्हणजे आज ते इतके रसातळाला आहेत की यापुढे त्यांना फक्त कामगिरी उंचावण्याचीच दिशा असेल. पण, हे करायला वेस्ट इंडिजला लागेल ते एक उद्दिष्ट. कदाचित ते निव्वळ पैसे नसेलही. 1882 ला इंग्लिश क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून हरल्यावर अ‍ॅशेसचा जन्म होऊन इंग्लिश क्रिकेटचे पुनरुत्थान झाले. 1976 ला टोनी ग्रेगने त्यांना ब्लॅक कम्युनिटी म्हटल्यावर त्यांनी फायर इन बॅबिलोन काय असते ते इंग्लडला दाखवले. वेस्ट इंडिज क्रिकेट पुन्हा जन्मायला अशाच एका जळत्या निखार्‍याची आज गरज आहे.

हेही वाचा;

Back to top button