अजित पवारांचं बंड आणि शरद पवारांचा ‘बंडोबा’ना इशारा; राज्यात राजकीय संघर्षाची नांदी | Ajit Pawar Deputy CM | पुढारी

अजित पवारांचं बंड आणि शरद पवारांचा 'बंडोबा'ना इशारा; राज्यात राजकीय संघर्षाची नांदी | Ajit Pawar Deputy CM

ज्ञानेश्वर बिजले : पुणे

उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपबरोबर जाण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकलांग झालाच, पण त्याचबरोबर देशात आकार घेत असलेल्या विरोधी पक्षांच्या ऐक्यालाही मोठा हादरा बसला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने आगामी काळात राज्यातील राजकारण ढवळून निघणार आहे.

भाजपसोबत आता विधानसभेत दोनशेच्या आसपास आमदार असल्यामुळे आगामी निवडणुकीत इच्छुकांची गर्दी विरोधी पक्षांकडे ओढली जाईल. त्यामुळे विद्यमान आमदारांसमोर विरोधी पक्षांची नवीन तरूण फळी विधानसभेच्या निवडणुकीत लढायला उतरेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आगामी राजकारणात काय भुमिका घेणार? त्यावर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी निश्चित होणार आहेत. सध्या तरी शरद पवार यांनी त्यांच्या पक्षातील आमदारांना मतदारसंघाची चिंता करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात येत्या काही दिवसांत कशा हालचाली होतील, त्यावर लक्ष ठेवावे लागणार आहे.

राष्ट्रवादी नेते सत्तेच्या जवळ

काँग्रेसमधून बाहेर 1999 मध्ये बाहेर पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण नेत्यांना गेल्या दोन दशकात सत्तेत राहण्याची सवय झाली होती. त्यामुळे त्यातील अनेकांना भाजपची ओढ लागली होती. त्यातच अनेकांविरोधात केंद्रीय संस्थांचा चौकशीचा ससेमिरा लागला होता. अजित पवार यांच्यासोबत सुनिल तटकरे, धनंजय मुंडे हे जाणे अपेक्षित होते. मात्र, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे नेते गेल्याने शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आगामी काळात शरद पवार यांची भुमिका महत्वाची ठरणार आहे. कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

अजित पवारांची कसोटी

शरद पवार हे लोकनेते म्हणून गेली सहा दशके महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यरत आहेत. अजित पवार उत्तम प्रशासक असले तरी लोकनेते म्हणून त्यांचा कधी कस लागलेला नाही. पक्षातील आमदारांवर त्यांची पकड असली तरी जनमानसांवर त्यांचा प्रभाव किती पडणार याची परीक्षा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत होणार आहे.

भाजपची तयारी

भाजपचे श्रेष्ठी आता लोकसभेत सलग तिसऱ्यांदा विजयी होण्याच्या तयारीला लागले आहेत. अशा वेळी बिहार आणि महाराष्ट्र या दोन मोठ्या राज्यांत त्यांच्यासमोर अडथळे निर्माण झाले. बिहारमध्ये जनता दलाचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडली, आणि विरोधी पक्षाच्या ऐक्याच्या प्रयत्नाला ते लागले आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेस व राष्ट्रवादीची साथ धरली. बिहारमध्ये 40 पैकी 17 जागा, तर महाराष्ट्रात 48 पैकी 23 जागा म्हणजेच 88 पैकी 40 खासदार भाजपचे आहेत. त्यांच्यासोबतीने गेली लोकसभा निवडणूक लढविलेल्या जनता दलाचे 17, तर शिवसेनेचे 18 खासदार आहेत. भाजपची या राज्यातील खासदारांची संख्या कमी करण्याचा विरोधकांचा डाव असला तरी जागा कायम राखत आणखी काही जागा वाढतील काय? याच्या तयारीला भाजप लागला आहे. त्याचाच परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील सध्याच्या घडामोडी घडत आहेत.

ठाकरे यांची शिवसेना गतवर्षी फुटली, शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांच्याबरोबर 40 आमदार आणि 13 खासदार भाजपसोबत गेले. त्याचवेळी राष्ट्रवादीचा मोठा गट भाजपबरोबर जाईल, अशी चर्चा होती. शिंदे यांच्याविरोधात शिवसेनेने वर्षभर गद्दार सरकार म्हणून वातावरण निर्माण केले. महाविकास आघाडी एकत्र लढल्यास भाजप व शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यासमोर मोठे आव्हान उभारण्याची शक्यता होती. ती लक्षात घेऊन भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला फोडण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांच्यासोबत सर्वोच्च न्यायालयात जे मुद्दे उपस्थित झाले, ते लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचाच पाठिंबा शिंदे सरकारला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आता आमदारांविरोधात फार काही करता येणार नाही. अजित पवार यांच्या मागे 35 आमदार असल्याची चर्चा आहे. मात्र, विधीमंडळ पक्षानेच पाठिंबा दिल्याने उर्वरित आमदारांची ससेहोलपट होणार आहे.

एकनाथ शिंदेचे काय होणार?

सध्या तरी ते मुख्यमंत्री आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयातील निकालाची टांगती तलवार त्यांच्याविरोधात आहे. शिंदे यांचे मुख्यमंत्री पद गेले, तर पवार हे मुख्यमंत्रीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर केंद्रात मंत्री म्हणून गेल्यास राज्याच्या राजकारणात पुन्हा फेरबदलाचे संकेत येतील. त्याचीही चर्चा जोरात सुरू झाली आहे.

राज्यावर काय परिणाम होईल…

तीन पक्ष एकत्र आले, भाजपचे 105 आमदार, शिवसेना शिंदे गटाचे 40 आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे 35 आणि 15 ते 20 जणांचा पाठिंबा हा आकडा 200 च्या आसपास पोहोचतो. त्यामुळे तीनही पक्षातील इच्छुकांची भुमिका आगामी निवडणुकीत काय राहील, त्यावर राज्यातील पुढील राजकीय घडामोडी ठरतील. भाजपमध्ये नव्याने दाखल झालेल्या नेत्यांचे काय होणार? त्यांची मोठी कुमक विरोधकांच्या हाती लागेल. त्याचा फायदा शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसला होईल.

मात्र, राज्यात भाजपची आघाडी आता भक्कम झाली. हे पर्सेप्शन आगामी लोकसभा निवडणुकीत राहिल्यास भाजपचा मोठा फायदा होईल. राष्ट्रवादीसोबत आल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजप बळकट झाली आहे. शिवसेनेचे 13 खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेपे 4 पैकी 2 खासदारांमध्ये सुनिल तटकरे, अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित होते. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि श्रीनिवास पाटील हे दोनच खासदार राष्ट्रवादीसोबत राहिले. पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. तेथे मोठे खिंडार पडल्याने सुळे आणि पाटील यांच्या जागेबाबतही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

उध्दव ठाकरे यांना समाजाची सुहानुभूती मिळाली, त्याच पध्दतीने शरद पवार यांच्यासारखा धुरंधर नेता आगामी काळात कशी भुमिका घेणार, त्यांच्यासोबत कोण राहणार, यावर विरोधकांच्या महाविकास आघाडीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. सध्यातरी अजित पवार सोबत आल्यामुळे भाजपची राज्यातील ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

Back to top button