Chandrashekhar Bawankule | बावनकुळेंचे शरद पवारांसंदर्भात ट्विट, ” मेरा घर- मेरे बच्चे…” | पुढारी

Chandrashekhar Bawankule | बावनकुळेंचे शरद पवारांसंदर्भात ट्विट, " मेरा घर- मेरे बच्चे..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : “तुम्ही आमच्या राजकारणाला पोरकट राजकारण म्हणून हिणवत आहात पण जनता तुमच्या ‘ मेरा घर – मेरे बच्चे‘ मोहिमेला साथ देणार नाही.” असं ट्विट करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ( Chandrashekhar Bawankule)

Chandrashekhar Bawankule : २०२४ मध्ये जनता तुम्हाला दाखवून देईल

चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावर पलटवार करताना आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे,” आदरणीय पवार साहेब, पोरकट आणि स्वतःच्याच मुलाबाळांना सत्ता मिळाली म्हणून कोण राजकारण करत आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्याध्यक्ष निवडताना सुद्धा तुम्हाला राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता दिसला नाही आणि तुम्ही सुप्रियाताईंच्या हाती सूत्र दिली यातच सर्व आलं. कार्याध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करायची हा तुमचा प्रश्न आहे. पण देश वाचविण्याच्या नावाखाली तुम्ही विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहात पण तुमची एकजूट देशासाठी नाही तर तुमच्या परिवाराला सत्ता मिळावी यासाठी आहे. हे लोकांना माहीत आहे.

मा. मोदीजींच्या नेतृत्त्वाखाली गेल्या नऊ वर्षांत जनतेचं राज्य सुरू आहे पण तुम्हाला ते बघवत नाही. म्हणून तुम्ही आमच्या राजकारणाला पोरकट राजकारण म्हणून हिणवत आहात पण जनता तुमच्या ‘ मेरा घर – मेरे बच्चे‘ मोहिमेला साथ देणार नाही. कोण पोरकट राजकारण करतंय आणि कोण देशहिताचं राजकारण करतंय? हे २०२४ मध्ये जनता तुम्हाला दाखवून देईल.”

काय म्हणाले होते शरद पवार

बारामतीत सोमवारी (दि. २६) सकाळी पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाटण्यातील बैठकीत १९ पंतप्रधान एकत्र आले होते, या विरोधकांच्या टीकेवर बोलत असताना  म्हणाले, हे त्यांचे पोरकटपणाचे भाष्य आहे. या बैठकीत पंतप्रधान या विषयाची चर्चा झाली नाही. महागाई, बेरोजगारी, सांप्रदायिक शक्ती वाढविण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल बैठकीत चर्चा झाली.  कोणत्याही राज्यात जाती-धर्मात मतभेद वाढले तर समाजाच्या दृष्टीने ते चांगले नाही. सत्ताधारी भाजप तशी पावले टाकत आहे. या सगळ्या गोष्टींना आवर घालण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे, हा बैठकीत चर्चेचा विषय होता. पण गेली दोन-तीन दिवस अनेक तथाकथित लोक यावर टीका करत आहेत. लोकशाहीत बैठकीची परवानगी नाही का असा सवाल त्यांनी केला.

पुढे बोलत असताना ते म्हणाले, “भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, बैठकीची गरज काय होती. पण मुंबईमध्ये मित्र पक्षांची बैठक भाजप घेणार असल्याची बातमी वाचण्यात आली. मग तुम्हाला बैठका घेता येतात इतरांनी घेतल्या तर त्यात चुकीचे काय. ‘मॅच्युअर पाॅलिटीक्स’ची कमतरता आहे, एवढेच मी याबाबत म्हणू शकेल.”

हेही वाचा 

Back to top button