मुख्यमंत्री शिंदेंनी केली यात्रा सेवासुविधांची पाहणी | पुढारी

मुख्यमंत्री शिंदेंनी केली यात्रा सेवासुविधांची पाहणी

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा :  आषाढी यात्रा एकादशी सोहळा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सोहळ्याला राज्यभरातून व परराज्यातील 12 ते 15 लाख भाविक येतील असा अंदाज आहे. या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये. भाविकांना अत्यावश्यक सेवा सुविधा पुरवाव्यात, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

रविवारी चक्क मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः पंढरपूर येथे उपस्थित राहत भाविकांना पुरवण्यात येणार्‍या सेवा सुविधांची पाहणी केली.
आषाढी यात्रेचा शासकीय महापूजेचा मान राज्याचे मुख्यमंत्री यांना जातो. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 29 जून रोजी साजरी होणार्‍या आषाढी एकादशीला शासकीय महापूजा करण्यासाठी येत आहेत. तत्पूर्वी त्यांनी अचानक पंढरपूर येथे भेट दिली. आषाढी यात्रेपूर्वी तयारीची पाहणी करणारे ते पहिले मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी अशी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेली नाही.

मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रथम गोपाळपूर येथे भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर दर्शन रांगेतील पत्राशेड येथे येऊन दर्शन रांगेतील भाविकांची विचारपूस केली. पुरवण्यात येणार्‍या सेवाबद्दल समाधानी आहात का? असे विचारले असता भाविकांनी समाधानी असल्याचे सांगितले. यानंतर मंदिर परिसर, महाद्वार घाट, चंद्रभागा वाळवंट येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी अधिकारी व कर्मचार्‍यांकडून भाविकांना सेवा सुविधा पुरवण्याबाबत कुचराई न करण्याचे आदेश दिले आहेत. भर रिमझिम पावसातही मुख्यमंत्री भाविकांची विचारपूस करत होते.
यावेळी मंत्री गिरिष महाजन, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आ. समाधान अवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आदींसह मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button