Mumbai Rains : मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये पुढील चार-पाच दिवस मुसळधार पाऊस | पुढारी

Mumbai Rains : मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये पुढील चार-पाच दिवस मुसळधार पाऊस

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : पुढील पाच दिवसांमध्ये मुंबईसह कोकण तसेच राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मान्सूनने राज्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार आणि मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. परिणामी पश्चिम घाट पर्वतरांगा, कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे प्रादेशिक हवामान विभागाच्या (आयएमडी) मुंबईतील अधिकारी सुषमा नायर यांनी रविवारी सांगितले.

मुंबईत शनिवारी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे नागरिकांची वाढत्या उकाड्यातून सुटका झाली असली तरी अनेक ठिकाणी पाणी साचलल्याने भीती निर्माण झाली आहे. मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये २६ जून रोजी दमदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, पुढील दोन दिवस मुसळधार आणि जोरदार पावसाचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्यात पुढील पाचही दिवस जोरदार पाऊस पडेल, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

दरवर्षी १० ते ११ जूनच्या दरम्यान मान्सून मुंबईत दाखल होतो. मात्र यंदा जून संपत आला तरी मान्सूनचा पत्ता नाही. बिपरजॉय वादळामुळे यावर्षी राज्यात मान्सून दाखल होण्यास जूनचा शेवटचा आठवडा लागला. मागील ४८ तासांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय झाला आहे.

Mumbai Rains

हेही वाचा : 

Back to top button