नवाब मलिक यांनी आता समीर ‘दाऊद’ वानखेडेंचा दाखला समोर आणला; वानखेडे न्यायालयात

नवाब मलिक यांनी आता समीर ‘दाऊद’ वानखेडेंचा दाखला समोर आणला; वानखेडे न्यायालयात
Published on
Updated on

मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. त्यांनी आता त्यांचा लग्नातील पहिला फोटो आणि दाखला ट्विटरवर पोस्ट केला आहे. Sameer Dawood Wankhede का यहां से शुरू हुआ फर्जीवाड़ा अशी कॅप्शन लिहून त्यांनी समीर वानखेडे यांचा दाखला ट्विट केला आहे. त्याचबरोबर त्यांनी Pehchan kaon? म्हणून समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो ग्रुपमधील असल्याचे लक्षात येते. हा फोटो त्यांच्या पहिल्या लग्नातील असल्याचे सोशल मीडियातील प्रतिक्रियेतून समोर येत आहे.

मुंबईमधील क्रुझ ड्रग्ज पार्टी आणि त्यानंतर झालेली कारवाई यावरून दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणातील पंच असलेला आणि फरार असलेल्या किरण गोसावीचा बॉडीगार्ड असलेल्या प्रभाकर साईल यांनी केलेल्या व्हिडिओनंतर या प्रकरणाला पुन्हा एकदा सनसनाटी वळण मिळाले आहे.

प्रभाकर साईल यांनी आर्यन खान प्रकरण दाबण्यासाठी २५ कोटींची मागणी केल्याचा दावा व्हिडिओतून केला आहे. सॅम नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून २५ कोटींची मागणी करून १८ कोटींवर प्रकरण सेटल करण्यास सांगितल्याचेही म्हटले आहे. या प्रकरणानंतर मुंबई एनसीबी संचालक समीर वानखेडे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. एनसीबीने सर्व आरोपी फेटाळून लावले आहेत.

समीर वानखेडे न्यायालयात

नवाब मलिकांकडून सुरु असलेल्या आरोपांवरून समीर वानखेडे यांनी खुलासा केला होता, पण प्रभाकर साईल यांच्या व्हिडिओनंतर त्यांनी आता न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत होत असलेल्या आरोपांवर न्यायालयात माहिती दिली. या कारवाईवरून सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांवरून केसवर परिणाम होऊ नये, म्हणून एनसीबीने न्यायालयात भूमिका स्पष्ट केली आहे.

आर्यनला वाचवण्यासाठी 25 कोटींची सेटलमेंट

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू असतानाच ही कारवाई करणार्‍या केंद्रीय अमली पदार्थ विरोधी विभागाच्या (एनसीबी) साक्षीदारानेच एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह एनसीबीवर रविवारी बॉम्ब टाकला. आर्यन खान याला ताब्यात घेतल्यानंतर सेटलमेंटसाठी शाहरुख खानकडे 25 कोटी रुपये मागण्यात आले. त्यातील 8 कोटी रुपये वानखेडेंना देण्यात येणार होते आणि बाकीचे वाटून घेण्यात येणार होते, असा दावा या पंचाने केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. एनसीबीच्या या पंचाच्या दाव्यामुळे एनसीबी पुन्हा एकदा संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे.

मुंबईहून गोव्याला निघालेल्या कॉर्डेलिया क्रूझवर एनसीबीच्या मुंबई विभागीय पथकाने 2 ऑक्टोबर रोजी छापेमारी करून ड्रग्ज पार्टी करत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह एकूण 14 जणांना ताब्यात घेतले. चौकशीअंती सहा जणांना सोडून देत एनसीबीने आर्यनसह त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा अशा आठ जणांना अटक केली. 2 ऑक्टोबरच्या दुपारपासून दुसर्‍या दिवशी पहाटेपर्यंत या नाट्यमय घडामोडी घडल्या. या कारवाईसाठी एनसीबीने एकूण 9 पंचांची मदत घेतली. यातील साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईल याने एक प्रतिज्ञापत्र दाखल करून अनेक धक्‍कादायक खुलासे केले आहेत.

'उनको बोल 25 करोड में डील करने के लिये. 18 करोड में फायनल कर

एनसीबी कार्यालयात तेव्हा एका खुर्चीवर आर्यन खान आणि त्याच्या शेजारी किरण गोसावी बसला होता. तेव्हा त्यांचा गूपचुप व्हिडीओ शूट केला. व्हिडीओमध्ये किरण गोसावी फोनवरून आर्यनचे कोणाशी तरी बोलणे करून देत होता. रात्री पावणेतीनच्या सुमारास गोसावी एनसीबी ऑफिसच्या खाली आला. तेव्हा सॅम डिसूझा नावाची व्यक्‍ती त्याला भेटायला आली होती. एनसीबी कारवाईच्या रात्री दोन वेळा त्यांची मीटिंग झाली. पहाटे साडेचारच्या सुमारास एनसीबी कार्यालयातून गोसावी लोअर परळला निघाला.

कारमध्ये साईलसुद्धा होता. गोसावीने पुन्हा सॅमला फोन केला. 'उनको बोल 25 करोड में डील करने के लिये. 18 करोड में फायनल कर. 8 करोड वानखेडे को देना हैं. बाकी 10 करोड आपस मे बाट लेंगे…' हे संभाषण साईलने ऐकले. त्यानुसार सॅम हा शाहरुख खान आणि गोसावी यांच्यामधील को-ऑर्डिनेटर होता. यापैकी 50 लाख गोसावीने घेतल्याचा दावाही त्याने केला आहे.

साळेकर नावाच्या एनसीबी अधिकार्‍याने आपल्याला 9 ते 10 कोर्‍या कागदांवर सह्या करायला सांगितले. याबाबत आपण साळेकर आणि गोसावीला कोर्‍या कागदावर सह्या कशा करू असे विचारले. तेव्हा समीर वानखेडे यांनी 'काहीही नाही होत. तू कर सह्या,' असे सांगितले. त्यानंतर आपण सह्या केल्या आणि आधार कार्ड सोबत नसल्याने त्याचा फोटो त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला, असा दावा प्रभाकर साईलने केला आहे.

हे ही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news