ramdas athawale म्हणतात वानखेडेंची नोकरी जाते की नवाब मलिकांचे मंत्रीपद ? | पुढारी

ramdas athawale म्हणतात वानखेडेंची नोकरी जाते की नवाब मलिकांचे मंत्रीपद ?

कराड ः पुढारी वृत्तसेवा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने मनसेसोबत युती करू नये, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. त्याचवेळी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची नोकरी जाणार की राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे मंत्रीपद जाणार ? हे पाहू, असा उपरोधिक टोलाही नामदार रामदास आठवले यांनी लगावला आहे. (ramdas athawale)

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कराडमधील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपाचे अप्रत्यक्षरित्या खंडनच केले आहे. एनसीबी, ईडी यांना स्वायत्त एजन्सी आहेत. अनियमितता असल्याचा संशय असल्यानेच ईडीकडून राज्यात चौकशी केली जात आहे. कोणत्याही विशिष्ट कुटूंबाला त्रास देण्याचा विषयच निर्माण होत नाही. चौकशीत काही दोष आढळला नाही, तर पुढील विषयच येणार नाहीत. खासदार शरद पवार यांचा आम्ही आदर करतो असेही सांगण्यास नामदार रामदास आठवले यावेळी विसरले नाहीत.

 ramdas athawale : तपास यंत्रणेचे अप्रत्यक्ष समर्थन

त्याचबरोबर आर्यन खान प्रकरणी एनसीबीने मिळालेल्या माहितीवरून छापा टाकला होता. त्यात आर्यन खानसह अन्य आरोपींना अटक करण्यात आली होती. हेतूपूर्वक कारवाईचा प्रश्नच निर्माण होत नाही असे सांगत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचे अप्रत्यक्षरीत्या समर्थन केले. तसेच एनसीबीकडे आर्यन खान विरोधात पुरावे असावेत आणि त्यामुळेच न्यायालयाकडून त्याला जामीन मंजूर होत नसावा, असेही नामदार रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.

याशिवाय मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाने आरपीआय सोबत युती केल्यास 100 अधिक जागा मिळून स्पष्ट बहुमत मिळणार आहे, असा विश्वासही नामदार आठवले यांनी व्यक्त केला. भाजपाचा महापौर तर आरपीआयचा उपमहापौर करण्याचे मान्य झाल्यास मुंबईतील लोक भाजपा – आरपीआय युतीला स्पष्ट कौल देतील असेही नामदार आठवले यांनी यावेळी सांगितले.

शेतकरी नेत्यांनी सरकारशी चर्चा करावी …

मागील पाच ते सहा महिन्यांपासून शेतकरी नेते केंद्र सरकारशी चर्चाच करत नाहीत. केेंद्र सरकार शेतकरी विरोधी नाही. शेतकर्‍यांना कृषी कायद्यातील काही तरतुदींवर आक्षेप असेल तर त्यात बदल केला जाऊ शकतो. मात्र सर्व कायदेच मागे घ्या, हे म्हणणे चुकीचे आहे. त्यामुळे आंदोलक शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केंद्र सरकारशी चर्चा करावी,असे आवाहनही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

Back to top button