Share Market Closing Bell | शेअर बाजारात चौफेर खरेदी, ‘या’ शेअरची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

Share Market Closing Bell | शेअर बाजारात चौफेर खरेदी, ‘या’ शेअरची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : देशांतर्गत महागाई कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी शेअर बाजारात तेजी राहिली. तसेच गुंतवणूकदार आता अमेरिकन महागाईच्या आकडेवारीची आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णयाची वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने आज सलग दुसऱ्या दिवशी तेजीत व्यवहार केला. बाजारात आज चौफेर खरेदी दिसून आली. सेन्सेक्स (Sensex) ४१८ अंकांनी वाढून ६३,१४३ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) ११४ अंकांच्या वाढीसह १८,७१६ वर स्थिरावला. आजच्या तेजीत एफएमसीजी, रियल्टी स्टॉक्स आघाडीवर राहिले. टाटा समुहातील शेअर्समध्ये आज खरेदीचा जोर अधिक होता. विशेष म्हणजे MRF शेअर्सने आज रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत १ लाखाचा टप्पा ओलांडला. (Share Market Closing Bell)

'हे' शेअर्स टॉप गेनर्स

सेन्सेक्सवर टायटन, एशियन पेंट्स, आयटीसी, बजाज फायनान्स, रिलायन्स, टाटा स्टील, अॅक्सिस बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस हे शेअर्स टॉप गेनर्स होते. कोटक बँक, एचसीएल टेक, एम अँड एम, टाटा मोटर्स, मारुती, एसबीआय हे शेअर्स घसरले. आयनॉक्स विंड एनर्जीच्या एकत्रीकरणाच्या योजनेला कंपनीने मान्यता दिल्यानंतर आयनॉक्स विंडचे शेअर्स (Shares of Inox Wind) सुमारे ४ टक्क्यांनी घसरले.

'या' शेअरची किंमत ऐकून थक्क व्हाल

टायर निर्माता एमआरएफ (MRF shares) चा शेअर मंगळवारी शेअर बाजारात एक नवीन मैलाचा दगड ठरला. हा १ लाखाचा टप्पा ओलांडणारा पहिला शेअर बनला आहे. MRF शेअरने १.३७ टक्के वाढ नोंदवून BSE वर १,००३०० चा ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. मे महिन्याच्या सुरुवातीला स्पॉट मार्केटमध्ये १ लाखाचा टप्पा गाठण्यासाठी MRF अवघ्या ६६.५० रुपयांनी कमी होता. ८ मे रोजी फ्युचर्स मार्केटमध्ये त्याने महत्त्वाची पातळी ओलांडली होती. दरम्यान, प्रति शेअर १ लाखावरून हा शेअर ९९,९९० रुपयांवर स्थिरावला. आज या शेअरमध्ये १ टक्के वाढ झाली.

भारतात, MRF हा सर्वात जास्त किंमत असलेल्या शेअर्सच्या यादीत अव्वल आहे. हनीवेल ऑटोमेशनचे शेअर्स आज ४१,१५२ रुपये किमतीला विकले जात होते, तो या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर या यादीत पेज इंडस्ट्रीज, श्री सिमेंट, 3M इंडिया, अॅबॉट इंडिया, नेस्ले आणि बॉश यांचे शेअर्स आहेत. (Share Market Closing Bell)

गेल्या ३ महिन्यांत सुमारे ४२,५०० कोटी रुपयांचे बाजार भांडवल असलेल्या या शेअर्समध्ये सुमारे २० टक्के वाढ झाली आहे. चेन्नई स्थित कंपनीचे एकूण ४२,४१,१४३ शेअर्स आहेत, त्यापैकी ३०,६०,३१२ शेअर्स सार्वजनिक भागधारकांच्या मालकीचे आहेत. ज्याचे प्रमाण एकूण इक्विटीच्या ७२.१६ टक्के एवढे आहे. प्रमोटर्सकडे ११,८०,८३१ शेअर्स आहेत, जे एकूण इक्विटीच्या २७.८४ टक्के आहेत.

शेअर बाजारात सर्वाधिक किंमत असलेले शेअर्स (१२ जून)

  • एमआरएफ – ९९,९९० रुपये
  • हनीवेल ऑटोमेशन- ४१,००२ रुपये
  • पेज इंडस्ट्रीज- ३८,१३३ रुपये
  • 3एम इंडिया – २६,४६४ रुपये
  • श्री सिमेंट- २५,७०९ रुपये
  • नेस्ले इंडिया – २२,२९० रुपये
  • ॲबॉट इंडिया- २१,९५३ रुपये
  • बॉश (Bosch)- १८,९८२ रुपये
  • प्रोक्टर अँड गँबल हायजीन- १३,९२६ रुपये
  • लक्ष्मी मशिन वर्क्स- १२,३१३ रुपये

जागतिक बाजारातील स्थिती

इकॉनॉमिक डाटा आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णयापूर्वी अमेरिकेतील शेअर बाजारात तेजी राहिली आहे. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज (Dow Jones Industrial Average) हा ०.६ टक्के घसरून ३४,०६६ वर पोहोचला. तर एस अँड पी (S&P 500) ५०० हा देखील वधारला आहे. तर नॅस्डॅक कंपोझिटने (Nasdaq Composite) १.५ टक्के वाढून १३,४६२ वर झेप घेतली. दरम्यान, आशियाई बाजारात संमिश्र वातावरण आहे. टोकियो, सेऊल, वेलिंग्टन आणि तैपेई येथील शेअर बाजारात तेजी राहिली. पण हाँगकाँग, शांघाय, सिडनी, सिंगापूर, मनिला आणि जकार्ता येथील बाजारातील वातावरण सुस्त होते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news