

आज तब्बल दीड वर्षांनी सरकारच्या अटी आणि शर्तीनुसार राज्यभरातील नाट्यगृहाचा पडदा उघडला. त्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांची खरी दिवाळी आजपासूनच सुरू झाली आहे असे आनंद उद्गार ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी डोंबिवली येथे काढले. डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील नटराजाचे पूजन करून नाटकाची घंटा वाजवण्यात आली. यावेळी अभिनेते दामले यांनी सरकारकडे नवीन कलाकारांना चांगले दिवस यावे यासाठी काही सुविधा द्यावा अशी मागणी पत्रकारांशी बोलताना केली.
एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा पहिला प्रयोग डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले रंगमंदिर येथे शनिवारी दुपारी पार पडला. यावेळी सरकारच्या निर्णयानुसार नाट्यगृहाच्या क्षमतेपेक्षा ५० टक्के आसन व्यवस्था करण्यात आली. नाट्यगृहाची आसन व्यवस्था ९७० असून त्यामध्ये ४८५ तिकीट विक्री करण्यात आली. नाट्यरासिकांचा उत्साह पाहून अभिनेते प्रशांत दामले यांनी आनंद व्यक्त केला. तसेच व्यवस्थापक दत्तात्रय लधवा यांनीही डोंबिवलीकर रसिक प्रेक्षकांनी सहकार्य केल्याचे सांगितले.
यावेळी डोंबिवली नाट्यपरिषदेच्या सदस्य भारती ताम्हणकर यांनी नाट्य कलाकारांना बातम्या प्रेक्षकांनी साथ देणे अतिशय गरजेचे असून स्वप्नवत असणारे काळे दिवस आता संपले आहेत असे मत व्यक्त केले. यावेळी नटराजाला कोकणी पद्धतीने कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी गाऱ्हाणे देखील घालण्यात आले. यावेळी ज्येष्ठ लेखक आनंद म्हासवेकर, कल्याण नाट्य परिषदेचे शिवाजी शिंदे, तरुण रंगकर्मी संकेत ओेक, गुजराथी नाट्यलेखक निरंजन पांड्या, महापालिका सचिव संजय जाधव तसेच नाटक पाहण्यासाठी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, भांडुप येथून आलेले रसिक प्रेक्षक उपस्थित होते.